Join us

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, आज वाढले सव्वातीन हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 9:15 PM

दिवसभरात राज्यात कोरोनाचे तब्बल ३ हजार २५४ रुग्ण सापडल्याने तसेच तब्बल १४९ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णांचे प्रमाण घटत असल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे तब्बल ३ हजार २५४ रुग्ण सापडल्याने तसेच तब्बल १४९ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १८७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कोरोनाचे ३ हजार २५४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे  राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९४ हजार ४१ झाला आहे. तर दिवसभरात १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ३ हजार ४३८ वर पोहोचला आहे. मात्र मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे आज १८७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे ४६ हजार ७४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. 

दरम्यान, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मुंबईत १८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत २३ हजार ६९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या मुंबईमध्ये २७ हजार १०९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई