Coronavirus: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८९६; बुधवारी १८३ रुग्णांचे निदान तर २ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:20 PM2020-04-15T22:20:15+5:302020-04-15T22:21:19+5:30

खासगी रुग्णालयांतील आणखी १४ जणांना कोरोनाची लागण

Coronavirus: The number of coronas patients in Mumbai is 1 thousand 896 pnm | Coronavirus: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८९६; बुधवारी १८३ रुग्णांचे निदान तर २ मृत्यूंची नोंद

Coronavirus: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८९६; बुधवारी १८३ रुग्णांचे निदान तर २ मृत्यूंची नोंद

Next

मुंबई -  मुंबईत बुधवारी मागील काही दिवसांच्या रुग्णसंख्या निदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. बुधवारी शहर उपनगरात १८३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, त्यामुळे मुंबईची रुग्णसंख्या दोन हजारांच्या नजीक म्हणजेच १ हजार ८९६ वर पोहोचली आहे. तर दोन मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतो आहे.

मुंबईत बुधवारी बाॅम्बे रुग्णालयात एकूण चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर मुंबई सेंट्रल येथील भाटिया रुग्णालयाच्याही आणखीन १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकुण रुग्णसंख्येचा आकडा ३५ वर गेला आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर होतो आहे.ब़ॉम्बे रुग्णालयातील एक डॉक्टर कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझीटीव्ह आल्याचे निदान झाल्यानंतर बुधवारी रुग्णालयातील १२० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय सहाय्यकाचा समावेश आहे. त्यात झालेल्या चाचणीमध्ये रुग्णालयातील चार जणांच्या चाचण्या कोरोनासाठी पॉझीटीव्ह आल्या आहेत. भाटिया रुग्णालयातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णालयाला लागून असलेल्या जुनी चिखलवाडी परिसरातील नागरिकांनी हा आरोप केला आहे. रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार करण्याची सुविधा नसतानादेखील भाटिया रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू केले. याबाबत कर्मचाऱ्यांनाही कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात २५ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे सामोर आले होते. आता पुन्हा आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईतील एकूण कोरोना (कोविड-१९) रुग्णांपैकी ८५७ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षण अंतर्गत कोविड संशयित रुग्ण आढळले आहेत. याखेरीज, ५ ते १४ एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोविड रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु कऱण्यात आले आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या १०० क्लिनिकमध्ये ३ हजार ९२९ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी, १ हजार ५४१ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत. मंगळवारप्यंत शहर उपनगरातील ३३ हजार ६३६ शासकीय, निमशासकीय, मनपा इमारती, रुग्णालय, दवाखाने, कोविड बाधितांची घरे, अलगीकरण संस्था-गृहे इ. इमारतींच्या आवारांमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

 

बुधवारी भरती झालेले संशयित रुग्ण        २८१

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण          ५३७९

बुधवारी निदान झालेले रुग्ण             १८३

एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण                  १८९६

बुधवारी झालेल्या मृत रुग्णांची नोंद         ०२

एकूण मृतांची संख्या                     ११३

मंगळवारी कोविडमधून मुक्त झालेले रुग्ण    १७

कोविड आजारातून मुक्त झालेले रुग्ण       १८१

आम्हाला न्याय द्या, कूपर रुग्णालयांच्या परिचारिकांचे आंदोलन

कूपर रुग्णालयात मंगळवारी एका रुग्णाने परिचारिकेला मारहाण केली. परिणामी या प्रकरणाची जबाबदारी रुग्णालय प्रशासनानेही घेतली नाही. त्यामुळे बुधवारी रुग्णालयाच्या आवारात परिचारिकांनी एकत्र येत आम्हाला न्याय द्या, आमच्या जीवाचा विचार करा अशी मागणी केली आहे. घर दार सोडून कोरोनाच्या लढाईन जीवाची पर्वा न करता आम्ही काम करतोय. तर दुसरीकडे आमच्या परिचारिका सहकारी असणाऱ्या महिलेवर रुग्ण हात उचलतोय ही स्थिती भीषण असून याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा, याची दखल घेऊन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.

Web Title: Coronavirus: The number of coronas patients in Mumbai is 1 thousand 896 pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.