मुंबई - एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक पातळीवर वाढला असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनाची वाढ हळूहळू घटू लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत राज्यामध्ये कोरोनाचे ५४ हजार ०२२ रुग्ण सापडले आहेत. तर ८९८ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत राज्यामध्ये कोरोनाचे ५४ हजार २२ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ८९८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३७ हजार ३८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज सापडलेल्या ५४ हजार २२ रुग्णांमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ९६ हजार ७५८ झाली आहे. तर आतापर्यंत ४२ लाख ६५ हजार ३२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्याबरोबरच राज्यात आतापर्यंत ७४ हजार ४१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये कोरोनाचे ६ लाख ५४ हजार ७८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ आता कर्नाटक, गोवा, तसेच इतर राज्यांमध्येही कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.