Join us

Coronavirus: धारावीत रुग्णांचा आकडा पोहोचला पाचशेवर; दोन दिवसांत १२७ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:42 AM

माहीममध्ये गेल्या दोन दिवसांत १७ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे.

मुंबई : धारावी परिसरात कोरोनाबाधित लोकांचा आकडा आता पाचशेवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये १२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, शनिवारी एकाच दिवसात तब्बल ८९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे वरळीनंतर धारावी सर्वाधिक संवेदनशील विभाग बनला आहे.

मात्र जास्तीत जास्त लोकांची चाचणी करण्यात आल्याने हा आकडा मोठा वाटत असल्याचा युक्तिवाद पालिका प्रशासनाने केला आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने मिशन धारावी व फिव्हर कॅम्प सुरू केले आहेत. तसेच डॉक्टर, परिचारिका व कामगार असे तब्बल तीन हजार पालिकेचे पथक कार्यरत आहे.

मात्र मुंबईतील अन्य विभागात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी होत असताना धारावीत रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत या परिसरात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा केंद्रातील पथकाने गेल्या आठवड्यात घेतला. त्यांच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त लोकांची चाचणी आणि संशयितांना क्वारंटाइन करण्यावर पालिकेने आता भर दिला आहे. त्यानुसार सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये महापालिकेने आपले नऊ दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे, साडेतीनशे खासगी दवाखाने यांच्या मदतीने तब्बल २५ हजार लोकांची तपासणी केली. यापैकी ताप असलेल्या १,९२० लोकांची चाचणी तर २,०५० लोकांना क्वारंटाइन केले आहे.१ मे रोजी ३८ तर २ मे रोजी ८९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे धारावीतील एकूण रुग्णसंख्या आता ४९६ झाली आहे. तर आतापर्यंत १८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

माहीममध्ये गेल्या दोन दिवसांत १७ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. तर दादरमध्ये शनिवारी १३ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या ४६ वर पोहोचली आहे. पालिकेचे नऊ दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, साडेतीनशे खासगी डॉक्टरांमार्फत झालेले सर्वेक्षण आणि बाधित रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क गटातील लोक अशा स्वरूपात गेल्या आठवड्याभरात २५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत धारावी परिसरात ७९ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसात केलेल्या तपासणीत तापाचे लक्षण असलेल्या १९२० लोकांची चाचणी करण्यात आली. तसेच २,०५० लोकांना धारावी पालिका शाळा, राजीव गांधी क्रीडा संकुल, मनोहर जोशी विद्यालय, माहीम नेचर पार्क येथे ठेवण्यात आले आहे.सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये महापालिकेने नऊ दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे, साडेतीनशे खासगी दवाखाने यांच्या मदतीने २५ हजार जणांची तपासणी केली. आतापर्यंत धारावी परिसरात ७९ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. गेला सहा दिवसात केलेल्या तपासणीत तापाचे लक्षण असलेल्या १,९२० लोकांची चाचणी केली़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या