CoronaVirus News: अंधेरी, दहिसर, भांडुपमध्ये रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:33 AM2020-06-19T01:33:46+5:302020-06-19T01:34:00+5:30
दहिसरमध्ये १३ दिवसांनी रुग्ण दुप्पट
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्यो वरळी, धारावी या विभागात रुग्ण वाढ नियंत्रणात आली आहे. पण अंधेरी, भांडुप आणि दहिसर या विभागांमध्ये गेल्या आठवड्याभरात पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबईत रुग्ण संख्या ३० दिवसांनी दुप्पट होत असताना या तीन विभागांमध्ये हे प्रमाण १३ ते २३ दिवसांचे आहे.
मुंबईत रुग्ण संख्या दुप्पट होण्याच्या प्रमाणात गेल्या दोन आठवड्यात मोठी सुधारणा झाली आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.३० टक्के असल्याची नोंद गुरुवारी झाली. मालाड, दहिसर, भांडुप आणि मुलुंड वगळता अन्य २० भागांत रुग्ण संख्या २० दिवसांनी दुप्पट होत आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये दहिसर विभागात ३३२ रुग्णांची वाढ झाली आहे. तर भांडुपमध्ये ७१३ आणि अंधेरी ७५८ रुग्ण वाढले. भांडुपमध्ये आतापर्यंत ३२७२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ३.६ टक्के आहे. १९ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तर एच पूर्व (खार, सांताक्रुझ)मध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ६४ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर १.१ टक्के असा सर्वात कमी आहे. एफ उत्तर (वडाळा, सायन) रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता ६२ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचे प्रमाण एच पूर्व इतकेच १.१ टक्के आहे.
दहिसर मध्ये १३ दिवसांनी रुग्ण दुप्पट
दहिसर विभागात १० जून रोजी ७६५ बाधित रुग्ण होते. मात्र १७ जूनपर्यंत ३३२ रुग्ण वाढले आहेत. सध्या १०४६ कोरोनाबाधित असून १३ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तसेच सर्वाधिक ५.३ टक्के वाढ या विभागात आढळली आहे.
विमानतळाच्या विभागातही वाढ
विमानतळानजीक असलेल्या के पूर्व (अंधेरी, विले पार्ले) विभागातील काही भागांमध्ये गेल्या सात दिवसात रुग्णांची संख्या ७५८ ने वाढली आहे. येथील दैनंदिन रुग्ण वाढीचा दर तीन टक्के आहे. तसेच २३ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. आतापर्यंत या विभागात ४३३६ रुग्णांची नोंद झाली आहे.