CoronaVirus: धारावीत क्वारंटाइन, चाचणीत वाढ; केंद्रीय पथकाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:53 AM2020-04-24T01:53:24+5:302020-04-24T01:54:17+5:30
उपाययोजनांचा आढावा व सूचना
मुंबई : वरळीनंतर आता धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे उभे राहिले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत या परिसरात सुरू असलेल्या उपाय योजनांचा आढावा केंद्रातील पथकाने बुधवारी केला. त्यांच्या सूचनेनुसार जास्तीजास्त लोकांची चाचणी आणि संशयितांना क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात येत आहे.
यासाठी धारावी, माहीम परिसरातील लॉजची जागा ताब्यात घेण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने मिशन धारावी व फिव्हर कॅम्प सुरू केले आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका व कामगार असे तब्बल तीन हजार पालिकेचे पथक कार्यरत आहे. मात्र मुंबईतील अन्य विभागात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी होत असताना धारावीत रुग्ण संख्या गुरुवारी २१५ वर पोहचली तर एकूण १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
या हॉट स्पॉटची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रातील पथकाने येथील क्वारंटाईनची व्यवस्था १२०० वरून तीन हजारपर्यंत वाढविण्याची सूचना केली. तसेच जास्तीजास्त लोकांची तपासणी करून संशयितांना त्वरित क्वारंटाईन करण्याचा सल्ला राज्य शासनाला दिला. त्यानुसार धारावी, माहीम परिसरातील लॉजमध्ये १३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुपारेल महाविद्यालयाच्या जागेचा ही वापर केला जाणार आहे. तर फिव्हर कॅम्प द्वारे होणाऱ्या तपासणीची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
धारावीत ३४ बाधित क्षेत्र असून असून ५० हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवार धारावी परिसरात २५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर शास्त्री नगर येथील ६९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता १३ झाली आहे.
धारावीमध्येही फिव्हर क्लिनिक आणि मिशन धारावीच्या माध्यमातून ४० हजार लोकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २२३ लोकांना कोरोना चाचणी करण्यास सांगण्यात आले.
होम क्वारंटाईन शिक्का मारलेल्या व्यक्ती धारावीत रस्त्यावर फिरताना दिसून आल्यानंतर त्यांना धारावी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.