CoronaVirus News: दीड लाख परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्र वापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:22 AM2020-06-16T05:22:51+5:302020-06-16T06:41:17+5:30

परतणाऱ्या सर्वांचे स्थानकांवर थर्मल चेकिंग

CoronaVirus One and a half lakh migrant workers return to Maharashtra | CoronaVirus News: दीड लाख परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्र वापसी

CoronaVirus News: दीड लाख परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्र वापसी

Next

- यदु जोशी

मुंबई : राज्याच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देणारी एक गुड न्यूज आहे. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने राज्यात परतत आहेत. गेल्या १५ दिवसांत तब्बल दीड लाख मजूर परतले आहेत.

लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात त्यांच्या राज्यात गेले. तब्बल ८४४ रेल्वेगाड्यांद्वारे १२ लाख ५ हजार मजूर स्वगृही परतले. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करायचे तर मजुरांची वानवा भासणार होती. सुरुवातीला परराज्यांमधून अत्यंत कमी मजूर येत होते, पण गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई, ठाणे व पालघर येथे २७९ रेल्वे गाड्यांमधून एक लाख मजुरांची वापसी झाली. बुलडाणा, नंदुरबार, गोंदिया, रायगड, सातारा, सोलापूर, नागपूर, पुणे या शहरांमिळून जवळपास चार हजार मजूर रोज परतत आहेत. गेल्या तेरा दिवसांत जवळपास ५० हजार मजूर राज्यात परतले आहेत.

राज्यातून ४४४ रेल्वे गाड्यांतून ६ लाख ४९ हजार मजूर उत्तर प्रदेशात तर १९२ रेल्वे गाड्यांद्वारे २.८0 लाख मजूर बिहारमध्ये परतले होते. एकट्या मुंबई व उपनगरामधून परतणाऱ्यांची संख्या ६ लाख ५२ हजार होती. पुण्यातून एक लाख २३ हजार तर ठाण्यातून एक लाख, रायगडमधून ५७ हजार, कोल्हापुरातून ४४ हजार तर पालघरमधून ७६ हजार मजूर परत गेले. मात्र आता त्यांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत.

मजुरांना मुंबईतील कोरोनाची भीती
घरवापसी केलेले परप्रांतीय मजूर महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये पुन्हा दाखल होत असले तरी त्यांच्या मनात मुंबईतल्या वाढत्या कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे मुंबईत परतणाºया मजुरांची संख्या इतर शहरांच्या तुलनेने कमी आहे. अनेकांना पुन्हा कामावर रूजू व्हायचे आहे, परंतु मुंबईतील रुग्णांचे वाढते आकडे बघून त्यांची माघारी येण्याची हिंमत होत नाही. मुंबईत परतण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून जास्त विरोध होत असल्याने आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. परंतु, अनेकांना रोजगाराची निकड असल्याने येत्या काही दिवसांत ते मुंबईची वाट धरतील, अशी आशा विकासक आणि कंत्राटदारांकडून व्यक्त होत आहे.

परतणाऱ्या सर्वांचे स्थानकांवर थर्मल चेकिंग
यासंबंधीची जबाबदारी सांभाळणारे सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया यांनी सांगितले की परतत असलेल्यांपैकी ९५ टक्के लोक हे मजूर आहेत. त्यांचे रेल्वे स्थानकावरच थर्मल चेकिंग/स्कॅनिंग केले जाते. प्रत्येकाच्या हातावर क्वारंटाईनचा ठप्पा लावला जातो. काही लक्षणे दिसल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्याची, तपासणीची व्यवस्था सरकारतर्फे केली जात आहे. मजुरांची आवश्यकता असलेले अनेक उद्योग मजुरांना परत आणण्यासाठी चांगले सहकार्य करीत आहेत.

Web Title: CoronaVirus One and a half lakh migrant workers return to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.