Coronavirus : मुंबई, पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण, राज्यात ४१ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:26 AM2020-03-18T07:26:49+5:302020-03-18T07:27:03+5:30
राज्यात मंगळवारी १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण १,१६९ प्रवासी राज्यात आले आहेत.
मुंबई : राज्यात मंगळवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. यापैकी एक मुंबईचा रुग्ण असून, हा ४९ वर्षांचा पुरुष ७ मार्च रोजी अमेरिकेतून परतला आहे, तर दुसरा रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी रुग्णालयात भरती असून, हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेतून मायदेशी परतला आहे.
दुबईहून ५ मार्च रोजी परतलेल्या आणि ८ मार्चपासून आजारी असलेल्या ६३ वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा राज्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू असून, त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हा रुग्ण पूर्वी हिंदुजा रुग्णालयात दाखल होता.
दरम्यान, राज्यात मंगळवारी १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण १,१६९ प्रवासी राज्यात आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर दादर येथे अंत्यसंस्कार
मध्य मुंबईतील कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. या व्यक्तीवर दुपारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खबरदारीच्या कारणास्तव मृतदेह निवासस्थानी न नेता काही मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताची पत्नी आणि मुलाने रुग्णालयातच अंत्यदर्शन घेतले.
महारेराच्या सुनावण्या रद्द; कर्मचारी घरून करणार काम
१ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यान्वये दाखल झालेल्या विविध याचिकांवरील १६ ते ३१ मार्चपर्यंतच्या सुनावण्या कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. महारेरा आणि अपिलीय न्यायाधिकरणाकडे होणाऱ्या या सुनावण्यांच्या बदललेल्या तारखा सर्व संबंधितांना कळविल्या जाणार आहेत.
२महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे सेक्रेटरी वसंत प्रभू यांनी हे परिपत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. अत्यंत निकडीच्या विषयांवरील सुनावणी मात्र घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नव्या प्रकल्पांची आणि एजंटची नोंदणी प्रक्रिया आॅनलाइन असल्याने ती या कार्यकाळात सुरू राहणार आहे, तसेच प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.
कस्तुरबा रुग्णालयात १५ रुग्ण
मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात मुंबईतील व मुंबईबाहेरील एकूण १५ रुग्ण दाखल आहेत. मात्र मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही, केवळ शासनाच्या सूचनांप्रमाणे गर्दी, प्रवास टाळून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात घाटकोपर येथील ४९ वर्षीय पुुरुषाला कोरोना असल्याचा निर्वाळा कस्तुरबा वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
घाटकोपर येथील ४९ वर्षीय पुरुष ७ मार्च रोजी अमेरिकेतून प्रवास करून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी आल्यानंतर मंगळवारी तो पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. या रुग्णाच्या ११ अतिजोखमीच्या निकटवासीय व्यक्ती आढळल्या असून त्यातील चार अतिजोखमीच्या व्यक्तींना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील सात रुग्ण, जोगेश्वरीत २० खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू
सेव्हन हिल्स हॉटेलमधील अलगीकरण कक्षातील प्रवासी १६
मिराज हॉटेलमधील अलगीकरण कक्षातील प्रवासी २४
आतापर्यंत एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ६००
नकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या ५४०
मंगळवारपर्यंत बाह्यरुग्ण कक्षात आलेले प्रवासी २२४७
मंगळवारपर्यंत डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण ४७६
मंगळवारपर्यंत रुग्णालयात भरती असलेले रुग्ण १२३
मंगळवारी तपासले गेलेले नमुने १३१