Join us

coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती

By अतुल कुलकर्णी | Published: March 31, 2021 9:43 AM

Coronavirus in Maharashtra : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

- अतुल कुलकर्णी मुंबई : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून अंगावर दुखणे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळीच उपचार न करण्यामुळे रुग्ण अत्यवस्थ स्थितीत दवाखाना गाठत आहेत. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून गेली आहे, ही बेफिकिरी समाजाचा घात करेल, अशी भीतीही डॉ. ओक यांनी व्यक्त केली. त्यांची ही खास मुलाखत.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांचे कोणते प्रयत्न सुरू आहेत?कोरोनाचे नियंत्रण ही केवळ वैद्यकीय विश्व आणि डॉक्टरांची जबाबदारी नाही. लस शोधायची होती. लस आली. दोन्ही लसी अत्यंत चांगल्या आहेत. पण सगळे काही डॉक्टर करतील आणि आम्ही बेजबाबदारपणे वाटेल तसे फिरत राहू, तर अशाने हा आजार कधीही आपल्यातून निघून जाणार नाही.  लॉकडाऊनमुळे साथ आटोक्यात येईल का?या निर्णयाला राजकीय आणि सामाजिक कंगोरे आहेत. लॉकडाऊनला विरोध जेवढा धोक्याचा तेवढा सरसकट लॉकडाऊनदेखील धोक्याचा आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. लोकांच्या मनातली भीतीच निघून गेली आहे. समाज जेव्हा बेबंदशाहीकडे झुकू लागतो, त्यावेळी पोलीस व सैन्याचे संचालन नागरी वस्तीत केले जाते. आज राज्यातल्या काही भागात जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पोलीस संचलन झाले आहे. मात्र आपल्या बेजबाबदार वागण्याने आपण सरकारला लॉकडाऊन करण्यास भाग पडत आहोत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी किती परिणामकारक आहेत?विनामास्क फिरणाऱ्यांना आजूबाजूच्या लोकांनी अडवले पाहिजे, मास्क लावण्याची सक्ती केली पाहिजे.  दोन्ही लसी चांगल्या आहेत. त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे अँटिबॉडीज तयार होण्यास मदत होते. अशा अँटिबॉडीज कोरोनाच्या विषाणूशी लढा द्यायला समर्थ असतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होईल. पण तो तुम्हाला व्हेन्टिलेटरपर्यंत नेणार नाही. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे?  सरकारलाही लाॅकडाऊन नको आहे. मात्र एका बाजूच्या पारड्यात मरण असताना दुसऱ्या बाजूला कसे वागावे याचे भान सुटत चालले आहे.  भाजी मार्केट, धान्य मार्केट या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांची गर्दी प्रचंड आहे. मास्क आणि सॅनिटायझर ही कवचकुंडले आहेत. कवचकुंडल फेकून दिल्यानंतर कर्णाची काय अवस्था झाली होती, हे मी सांगण्याची गरज नाही. या व्हायरसची शक्ती वाढलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बेफिकीर झालो आहोत. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, वेळच्या वेळी हात धुवा, कुठल्याही लॉकडाऊनची गरज पडणार नाही, मात्र लोक हे मानायला तयार नाहीत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लस