coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 08:24 AM2020-03-29T08:24:14+5:302020-03-29T08:35:58+5:30
सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावघीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दुध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई – सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल.
सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावघीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दुध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे. पण यासाठी वाहतूक सुरु करण्यापूर्वी संबंधित वाहनास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे.
यासाठी सध्या पोलीस, आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना पास देण्यात येत आहेत. आता याबरोबरच संबंधित वाहनधारकांना ऑनलाईन प्रणालीमार्फतही ई-पास देण्यात येणार आहेत यासाठी त्यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन अर्ज करुन आपला ई-पास प्राप्त करुन घ्यावा, असे राज्यात शासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ऑनलाईन प्रणालीवरुन प्राप्त अर्जाची पोलीसांमार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतर वाहनधारकाला आपला ई-पास ऑनलाईन प्रणालीवरुनच डाऊनलोड करुन घेता येईल. हा पास प्राप्त झाल्यानंतर वाहनधारक वाहतूक करु शकेल.
सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. त्याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येईल. पोलिस यंत्रणेच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करूता येईल.
ई-पासमध्ये अर्जदाराची माहिती, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवावी, असे या पत्रकात म्हंटले आहे. वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्याचे आढळल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.