coronavirus: कामगारांच्या तुटवड्यामुळे राज्यात अवघी ३० ते ३५ टक्के हॉटेल्स सुरू, पहिल्या दिवशी फक्त ५ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:18 AM2020-07-09T05:18:43+5:302020-07-09T05:20:17+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारपासून मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात बुधवारपासून सरकारच्या कार्यपद्धतीनुसार हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. परंतु कामगारांचा तुटवडा आणि ग्राहकांचा अभाव यामुळे राज्यात पहिल्या दिवशी बुधवारी केवळ ३० ते ३५ टक्के हॉटेल्स सुरू झाली. तर पाच टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याची माहिती हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारपासून मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षिश सिंग कोहली म्हणाले, परवानगीनुसार ३३ टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. पण अशा प्रकारे हॉटेल सुरू करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत.
कारण हॉटेल क्षेत्रात एकूण कामगारांपैकी ७० टक्के कामगार हे स्थलांतरित आहेत. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कामगारांअभावी अनेक हॉटेलचालकांना हॉटेल्स सुरू करता आलेली नाहीत. तसेच वाहतुकीची व्यवस्था नसल्याने ग्राहकांनाही येता येत नाही.
काही हॉटेल चालकांनी सावध पवित्रा घेतला आहे. सुरू झालेल्या हॉटेल्सना कसा प्रतिसाद मिळतो यावरून ते निर्णय घेणार आहेत.
अनेक हॉटेलचालकांकडे पैसे नसल्याने त्यांनी हॉटेल्स बंद ठेवली आहेत. परंतु किती हॉटेल्स सुरू होणार आहेत याबाबतचे चित्र
एक ते दोन आठवड्यांत स्पष्ट होईल. हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवण देताना युज अॅण्ड थ्रो प्लेटमध्ये जेवण दिले जाते. खोलीबाहेर हॉटेल कर्मचारी जेवणाची ट्रॉली आणतात. त्यामधून ग्राहक आपली प्लेट घेऊन जातात. ग्राहक परत गेल्यानंतर निर्जंतुकीकरण करून एक दिवस खोली रिकामी ठेवली जाते,
त्यानंतर दुसऱ्या ग्राहकाला दिली जाते, असे द फर्न रेसिडेन्सीचे फ्रंट आॅफिस मॅनेजर नितीन दळवी यांनी सांगितले.
कशी सुरू आहे हॉटेल सेवा
एखाद्या ग्राहकाला हॉटेलमध्ये जायचे असेल तर त्यापूर्वी त्याला आॅनलाइन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. ती व्यक्ती परदेशी नागरिक आहे का? किंवा व्यावसायिक कारणासाठी की क्वारंटाइन होण्यासाठी? हे पाहिले जाते. गेल्या १५ दिवसांत ग्राहक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले का? तेही विचारले जाते. हॉटेलमध्ये येताना गेटवर दोनवेळा स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरण केले जाते. ग्राहकाच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते. पेमेंट आॅनलाइन करण्यात येते. त्यामुळे संपर्क टाळता येतो. त्यानंतर ग्राहकाला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो.
मेन्यू कार्डमधील ३५ टक्के डिश कमी
लॉकडाऊनमुळे मशरूम, ब्रोकोली आदी भाज्यांची कमतरता आहे; त्यामुळे मेन्यूकार्डमधील डिश कमी करण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांना पोषक आहार हवा आहे त्यांच्यासाठी डाळ, भात, पोळी, भाजी असलेली सेट थाळी तयार करण्यात आली आहे.