Coronavirus : उद्या लोकलच्या मोजक्याच फेऱ्या; लांब पल्ल्याच्या ४000 गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:20 AM2020-03-21T07:20:01+5:302020-03-21T07:21:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील शनिवारी जाहीर केला जाईल.
त्याचवेळी देशभरातील रेल्वेच्या ४००० गाड्या बंद राहणार आहेत. यात २४०० पॅसेंजर तर, १३०० लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे ४ ते रात्री १० या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी मुंबईत लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच मेगाब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेºया रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल. आयआरसीटीसीनेही फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जनआहार, सेल किचन या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परप्रांतीय माघारी
खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देताच वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही गावाकडे निघाले. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.