मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही राजकारण न करता सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देऊ, त्यांच्या मागे उभं राहू असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पण सध्या जे सत्तेत आहेत ते दुर्दैवाने विरोधक असल्यासारखे वागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी राज्याचं बजेट तयार केले त्यावेळी कोरोना येईल याची कल्पना नव्हती. ज्यावेळी बजेट मांडलं त्यावेळी जीएसटीचे पैसे येतील हे लक्षात घेऊन १० टक्के तरतूद मागच्या बजेटपेक्षा वाढवण्यात आली. कोरोनामुळे जीएसटीचे पैसे राज्यालाही मिळत नाही तसे केंद्रालाही मिळाले नाहीत. केंद्र सरकार राज्याला मदत करत आहेत. जीएसटीचे पैसे आले नाहीत हे अर्धसत्य आहे. उद्धव ठाकरे केंद्राचे आभार मानतात मग इतर नेते केंद्रावर प्रश्नचिन्ह का उभं करतंय. काही मंत्र्यांना आणि नेत्यांना राजकारण करायचं आहे. केंद्र महाराष्ट्राला मदत करतंय आणि भविष्यालाही करतंय, काही नेते दिशाभूल करत आहे असा आरोप त्यांनी लावला.
तसेच उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर भाजपा नेते प्रश्चचिन्ह उपस्थित करत आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला किती गुण द्याल असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंच्या कामाचं मूल्यमापन करण्याची ही वेळ नाही. कोरोना संपल्यावर त्यांना गुण देऊ, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते जे निर्णय घेत असतील त्याला पाठिंबा देत आहोत.काही त्रुटी असतील तर त्या निर्दशनास आणत आहोत. एकत्रितपणे राज्य सरकारला पाठिंबा देऊन या कठिण काळात राजकारण करणार नाही असं फडणवीस म्हणाले.
त्याचसोबत ३ महत्त्वाचे सल्ले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. एक म्हणजे सगळ्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे, रेशनकार्ड आहे की नाही हे न पाहता अन्नधान्य द्या, दुसरं दाटवस्त्यांमध्ये सरकारची चांगल्या अर्थाने दहशत करण्याची वेळ आहे. कोणत्याही परिस्थिती पॉझिटिव्ह रुग्ण आढळता कामा नये यासाठी कठोर पावलं उचला. कारण राज्यात कोरोनामुळे मृत्युदर वाढत आहे. आर्थिक अडचण आहे. पण राज्य आर्थिक चणचणीतून बाहेर येऊ शकतं. जे निर्णय घ्यायचे आहे ते बेधडक घ्या, आम्ही सोबत आहोत आणि शेवट आरोग्य कर्मचारी आहेत त्यांची काळजी घ्या असं फडणवीसांनी सांगितले