Join us

CoronaVirus: अन्नाचे पाकीट घेत फोटो काढण्यास गरजूंचा विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:44 AM

अंबोली परिसरातील घटना; आत्महत्येचा केला प्रयत्न

मुंबई : अंधेरीत एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बुधवारी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. राजकीय पक्षाच्या लोकांकडून जेवणाचे पाकीट स्वीकारताना फोटो काढण्यास नकार दिल्याने त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे असून याप्रकरणी अंबोली पोलीस चौकशी करत आहेत.अंधेरीच्या वीरा देसाई रोड येथे सबेरा सोसायटीमध्ये स्थानिक आमदारामार्फत तयार अन्नाची पाकिटे गरजूंना वाटण्याचे काम सुरू होते. ही पाकिटे घेणाऱ्यांचे फोटोदेखील आमदाराच्या लोकांकडून काढले जात होते. त्यावेळी बाबू धनगर आणि त्याचा लहान भाऊ रमेश यांनाही जेवण देत त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र फोटो काढण्यास मनाई करत बाबू व त्याच्या भावाने कार्यकर्त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अन्नवाटपाचे फोटो आम्हाला आमदारांना दाखवावे लागतात असे त्यांनी दोघा भावांना समजविले. तसेच तुम्हाला जेवण नको असल्यास तुम्ही नका घेऊ, असेही एका महिलेने सांगितले. मात्र तरीही हा प्रकार सुरू राखत त्या महिलेच्या पोटात बाबू याने लाथ मारली. त्यामुळे एका महिला कार्यकर्त्याने याबाबत अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यानुसार घरी येत्या चोवीस तासात पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बाबूच्या घरी पोलिसांनी देत त्याच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची कल्पना त्याला दिली.या प्रकाराने घाबरलेल्या बाबूने घरातील फिनाईल पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार करत नंतर घरी सोडण्यात आले. सुरुवातीला याप्रकरणी शेरेबाजीचे कलम लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर संशयिताने महिलेला लाथ मारल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणी विनयभंगाचे कलमही जोडण्यात आले. त्यानुसार विनयभंग आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.सोशल मीडियावर होते गरिबांची थट्टा!बाबू याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजकीय लोक जेवण किंवा धान्यवाटप करताना आमचे फोटो काढतात आणि नंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्याचा मी विरोध केल्याने हे वाद झाले. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे व लोकांनी ते करू नये़आम्हाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि दोन दिवसांनंतर विनयभंग केल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आला. त्याच तणावात मी फिनाईल प्राशन केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या