CoronaVirus : "सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 05:15 PM2020-04-01T17:15:37+5:302020-04-01T17:18:25+5:30
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या संसर्ग रुग्णांची तपासणी करून निदान करण्याकरिता ठाणे जिल्ह्यात खासगी लॅब्स सोडल्यास दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याचे आ. डॉ. किणीकर म्हणाले.
अंबरनाथ - ठाणे जिल्ह्यासह राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्याकरिता आवश्यक अशा लॅब्स उपलब्ध असल्याने त्यात तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी लेखी मागणी आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या संसर्ग रुग्णांची तपासणी करून निदान करण्याकरिता ठाणे जिल्ह्यात खासगी लॅब्स सोडल्यास दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याचे आ. डॉ. किणीकर म्हणाले.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेक जण कस्तुरबा रुग्णालयात तपासणीकरिता जाण्यासाठी देखील घाबरत आहेत. सध्या ज्या खासगी लॅब्समध्ये तपासणी करण्यात येत आहे, त्यांच्याकडून रु. ४,५००/- इतकी फी आकारण्यात येत आहे. गोरगरीब नागरिकांना ती फी परवडणारी नसल्याने अनेकजण तपासणी करण्याचे टाळत आहेत ही चिंतेची बाब असल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ठाणे जिल्ह्यासह राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करण्याकरिता आवश्यक अशा लॅब्स उपलब्ध असल्याने याठिकाणी कमी फी आकारून तपासणी करण्याकरिता परवानगी देण्यात आल्यास सोयीचे होऊन बाधित रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होऊ शकेल असे आमदार डॉ. किणीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.