मुंबई : राज्यासह मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. परिणामी, अवयवदान ठप्प झाले आहे. मागील वर्षी २०१९ साली मुंबईत ७९ अवयवदान पार पडले. मात्र, यंदा एप्रिलमध्ये एकही अवयवदान झालेले नाही. तर यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत २१ अवयवदान पार पडले.
सध्या शहर, उपनगरात तीन हजार ६९२ व्यक्ती मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शहर, उपनगरातील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती मुंबई जिल्हे विभागीय प्रत्यारोपण समितीने दिलीे. याविषयी, समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश माथुर यांनी सांगितले की, अवयवदानाविषयी राज्यातील कोरोना (कोविड-१९) टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञाांशी सातत्याने चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता प्रत्यारोपण करू नये, असे सुचविले आहे. आपत्कालीन स्थितीत करण्यात येणाऱ्या प्रत्यारोपणात कोरोनाविषयी सर्व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपल्याकडील व परदेशातील अवयवदानाच्या स्थितीत तफावत आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव असताना तेथे अवयवदानाचा आलेख कमी झाला आहे. मात्र, थांबलेला नाही. आपल्याकडील स्थितीमुळे अवयवदानाची टक्केवारी घसरण्याची भीती आहे, अशी माहिती डॉ. माथुर यांनी दिली. सध्या मुंबईत मूत्रपिंड प्रत्यारोपणासह यकृतासाठी ३८५, हृदयासाठी २८ तर फुप्फुस प्रत्यारोपणासाठी १४ जण प्रतीक्षेत आहेत.