मुंबई - सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच भाजपाची सत्ता असलेल्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारला योग्य ती मदत होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्राचे आभार मानण्यात आले आहेत. मात्र काहीजण या संकटाच्या प्रसंगी राजकारण करत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. त्याबरोबरच पंतप्रधान निधीप्रमाणेच मुख्यमंत्री निधी हा सुद्धा महत्वाचा आहे, त्यामुळे मी मुखमंत्री निधीलाही मदत करण्याचे आवाहन केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एबीपी माझा या वृत्तवहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी संकटकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहणार असे सांगतानाच राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर वचक बसणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दिवसातून दोन ते तीन वेळा पोलिसांचा फ्लॅगमार्च होण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स बाळगून नियम शिथिल करण्याची गरज आहे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. त्याबरोबरच रेशन पुरवठ्यातील घोळ दूर होऊन लोकांपर्यत धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्याबरोबरच राज्यात भिलवाडा पॅटर्न लागू करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच मुंबईमध्ये धान्य पुरवठ्याचे विकेंद्रीकरण करण्यात यावे असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.