Coronavirus : राज्यातील ऑक्सिजनची गरज वाढली, पुरवठा वाढवा; राज्य सरकारची केंद्राला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:00 PM2021-05-04T16:00:00+5:302021-05-04T16:01:52+5:30
Coronavirus In Maharashtra : राज्याला होणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये वाढ करावी अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग स्थिरावला असून, राज्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. (Coronavirus In Maharashtra) मात्र राज्यातील उपचाराधिन कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली आहे. त्यामुळे राज्याला होणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये वाढ करावी अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. ( Oxygen demand in the state increased, ernment Maharashtra Govrequest to the Center to increase the supply by 200 metric tons)
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे हे लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरू करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावे. अशी विनंती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना लिहिलेल्या पत्रामधून केली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काल ४८ हजार ६२१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती, तर ५९ हजार ५०० जणांनी कोरोनावर मात केली होती. आतापर्यंत राज्यात एकूण ४० लाख ४१ हजार १५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ६ लाख ५६ हजार ८७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.