CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णालयात बेड नसल्यानं कोरोनाबाधिताला घरी पाठवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:39 PM2020-05-20T18:39:20+5:302020-05-20T18:40:14+5:30
CoronaVirus News: रुग्ण सापडल्यानंतर कित्येक तासांनी इमारत सील; अद्याप शेजाऱ्यांची कोरोना चाचणी नाही
मुंबई: रुग्णालयात बेड नसल्यानं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला होम क्वारंटीन करण्यात आल्याचा प्रकार वडाळ्यातल्या अँटॉप हिल भागात घडला. या परिसरात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यातच या प्रकारामुळे स्थानिकांची चिंता आणखी वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिका प्रशासनानं कोरोना रुग्ण सापडल्यानंतर कित्येक तास तो वास्तव्यास असलेली इमारत किंवा राहत असलेला मजलादेखील सील केला नव्हता.
अखेर आज पालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर कोरोना रुग्णाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केलं. यानंतर रुग्ण वास्तव्यास असलेली इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली. इमारतीतल्या दोन लिफ्टदेखील सील करण्यात आल्या. एफ-उत्तर वॉर्डमध्ये अनेक फिवर क्लिनिक्स सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. न्यूज१८ या इंग्रजी संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
१९ मे रोजी वडाळ्यातल्या एका एसआरएच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सोमय्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे बेड उपलब्ध नव्हते. संबंधित रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला घरी सोडण्यात आलं. रुग्णाच्या शेजाऱ्यांनी क्वांरिटन करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या नाहीत. त्यांची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास किमान ती राहत असलेला मजला सील केला जावा, असं नियम सांगतो. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही नियम पाळला नाही.
याबद्दल पालिका अधिकाऱ्याला विचारणा केली असता, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णाच्या कुटुंबानं त्याला घरी आणल्याची माहिती त्यानं दिली. अधिकाऱ्यांनी इमारतीचा मजला का सील केला नाही, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितली. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पालिकेच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणार
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त
'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा