मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा सातत्यानं वाढतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे राज्य शासनासह मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. ही संख्या येत्या ३ ते ४ दिवसांत आणखी वेगानं वाढेल, असा अंदाज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींनी व्यक्त केला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा तीन ते साडे तीन हजारांवर जाईल. मात्र परिस्थिती नियंत्रणात असेल. ती हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दर दहा लाखांमागे साधारणत: ३०० कोरोनाचे रुग्ण सापडतील, असा माझा अंदाज आहे. जागतिक पातळीवर ही सरासरी १०० ते १५० इतकी आहे. मात्र फ्रान्स, इटलीमध्ये हाच आकडा १२०० च्या घरात असल्याची आकडेवारी त्यांनी सांगितली.लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. मात्र लॉकडाऊनमुळे बराच फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन नसता, तर दर दहा लाखांमागे ६०० ते ७०० रुग्ण आढळले असते, असं आयुक्त म्हणाले. मुंबईत कोरोना चाचण्या होण्याचं प्रमाण अधिक असल्यानंच रुग्णांची संख्या जास्त असल्याचं परदेशी यांनी आकडेवारीसह सांगितलं. दिल्लीची लोकसंख्या दीड कोटी इतकी आहे. त्यांनी ५५०० चाचण्या केल्या आहेत. आपण १२ हजार चाचण्या केल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे आपण ८८४ तपासण्या केल्या आहेत. दिल्लीत हेच प्रमाण १९२ इतकं आहे. त्यामुळेच मुंबईतील रुग्णसंख्या अधिक असल्याचं आयुक्तांनी म्हटलं.
CoronaVirus: येत्या ३-४ दिवसांत मुंबईत वाढणार कोरोनाग्रस्तांची संख्या; आयुक्तांच्या अंदाजानं वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 3:25 PM