मुंबई - लॉकडाऊनच्या काळात कुणालाही नोकरीवरून काढू नये, तसेच कुणाचाही पगार थकवू नये असे आदेश केंद्र सरकारचे आहेत. कोरोनाच्या संकटात औषध निर्मिती-वितरणामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांना वेळेस पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत कौन्सिललने आता कडक भूमिका घेतली आहे.
फार्मसी कंपन्या आणि फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन द्यावे, असे आदेश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने देशातील फार्मास्यूटिकल कंपन्यांना दिले आहेत, याविषयी लेखी निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आले आहे.
केंद्राच्या आदेशानुसार फार्मास्यूटिकल कंपन्यांना कर्मचाऱयांचे पगार थकवता येणार नाहीत. तेव्हा कुठल्याही फार्मास्यूटिकल कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थकवू नये. थकीत पगार लवकर द्यावेत, असे आदेश कौन्सिलने दिले आहेत.