Coronavirus: कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन; एसटीचे धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:36 AM2020-05-08T03:36:09+5:302020-05-08T03:36:23+5:30
विविध जिल्ह्यांत अडकलेल्यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बसेस सज्ज झाल्या आहेत
मुंबई : लॉकडाउनच्या काळात कर्तव्यावर उपस्थित असणाºया कर्मचाऱ्यांना आधी वेतन देण्यात येणार असल्याचे धोरण एसटी महामंडळाने स्वीकारले आहे. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून एसटीची सेवा सुरू आहे. मात्र एसटी कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने एसटीच्या फेºयांवर परिणाम होतो. एसटी कर्मचाºयांची संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश कर्मचाºयांना दिले होते. मात्र, अनेक कर्मचारी गैरहजर राहत आहेत. यासाठी बुधवारी एसटी महामंडळाने कर्मचाºयांच्या वेतन संबंधित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, लॉकडाउनच्या काळात काम करणाºया कर्मचाºयांना एप्रिल आणि मे २०२० या महिन्याचे वेतन देण्यात यावे. उर्वरित अधिकारी आणि कर्मचाºयांना एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन राज्य सरकारकडून प्रलंबित असलेल्या सवलत मूल्याची रक्कम प्राप्त झाल्यावर द्यावे, असे धोरण एसटी महामंडळ राबवेल.
लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले आहे. कर्मचाºयांचा वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मार्चच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने सवलतीच्या ३०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारला केली होती. त्यातील १५० कोटी मंडळाला मिळाले. त्यातून मार्चचे वेतन देण्यात येईल. राज्य सरकारकडे सवलतींच्या एकूण ५४८ कोटींपैकी आता ३९८ कोटी शिल्लक आहेत. एप्रिल, मे महिन्याचे वेतन सरकारच्या सवलतीच्या निधीवरच अवलंबून आहे.
यासाठीच नवा निर्णय
विविध जिल्ह्यांत अडकलेल्यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बसेस सज्ज झाल्या आहेत. मात्र, कर्मचारी उपस्थिती नाही. यासाठी कर्मचाºयांना कामावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळाने हे नवीन धोरण आखल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये आहे.