CoronaVirus: पेट्रोलविक्री घटली तब्बल १० ते १५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:39 AM2020-04-24T01:39:10+5:302020-04-24T01:39:19+5:30
वाहने रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण घटल्याने पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मोठी घट
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र त्याचा फटका पेट्रोल पंपचालकांना बसू लागला आहे. वाहने रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण घटल्याने पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. इंधनविक्री अवघ्या १५ टक्क्यांवर आली आहे.
रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याने वाहतूक कोंडी होत नसून रस्ते मोकळे झाल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र त्याचा फटका पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर झाल्याने पंप चालकांना मात्र आर्थिक समस्या भेडसावू लागली आहे. याबाबत, पेट्रोल डिलर असोसिएशन मुंबईचे माजी अध्यक्ष रवी शिंंदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पेट्रोल-डिझेलची विक्री अवघ्या १५ टक्क्यांवर आल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आमचा कर्मचारी वर्ग आमच्या सोबत वर्षानुवर्षे काम करत आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना वेळेवर पूर्ण वेतन देणे, भत्ते देणे ही पंप चालकांची जबाबदारी असून आम्ही ही जबाबदारी पूर्ण करत आहोत. पंपावर सोशल डिस्टन्सिंंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पुरवण्यात आले असून, त्याचा योग्य व नियमित वापर करण्याकडे लक्ष दिले जात आहे.
काही पेट्रोल पंप चालकांसमोर कर्मचाºयांना वेळेवर वेतन कसे द्यायचे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.