Join us

Coronavirus: प्लेटलेट्स दानवीराने ओलांडले अर्धशतक! अद्याप ५४ वेळा केले दान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:30 AM

कोरोना संकटातही कार्याला लागला नाही ब्रेक

गौरी टेंबकर-कलगुटकर 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडणे जिकिरीचे आहे. रुग्णांना प्लेटलेट्सची कमतरता भासू नये यासाठी मालाडमधील संजय मोदी हे विविध रुग्णालयात जाऊन प्लेटलेट्स दान करत आहेत़ टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाचाही समावेश आहे. महामारीचे संकटही त्यांच्या या कार्याला ब्रेक लावू शकलेले नसून त्यांनी अद्याप ५४ वेळा हे दान केल्याने वैद्यकीय क्षेत्राकडूनही त्यांचे हे कौतुक केले गेले जात आहे.

व्यवसायाने विकासक असलेले मोदी हे मालाडमधील आदर्श हेरिटेज इमारतीत राहतात. मोदी हे गेल्या अनेक महिन्यांपासून दर १५ दिवसांनी प्लेटलेट्स दान करण्यासाठी परळच्या टाटा रुग्णालयासह अनेक रुग्णालयात भेट देतात. त्यांनी ६ एप्रिल, २०२० रोजी ५४ वे प्लेटलेट्स दान केले़ त्यांचे हे कार्य फारच कौतुकास्पद आणि अन्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. टाटा रुग्णालयात त्यांनी ४५ वेळा हे दान केले आहे. तर लीलावती, हाजीअली येथील एसआरसीसी व बोरीवली ब्लड बँकेचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर स्वत:सोबत ते अन्य लोकांनाही आपल्यासोबत प्लेटलेट्स दान करण्यासाठी प्रोत्साहन देत इच्छुकांना स्वत: घरातून रुग्णालयात नेत आहेत. त्यानंतर जबाबदारीने घरी सोडत आहेत. टाटा रुग्णालयानेही याबाबत त्यांचे कौतुक केले आहे.देशसेवेचे समाधान मिळते!कोरोना आजारामुळे अनेक ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प रद्द करण्यात आले आहेत. रुग्णांना प्लेटलेट्सची कमतरता भासू नये यासाठी मी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. रेल्वे आणि बसेस बंद असल्याने अन्य लोकांना प्लेटलेट्स दान करण्यासाठी वाहतूक करणे शक्य नसल्याने मी माझ्या कारने स्वत: त्यांना सोबत घेऊन जातो आणि पुन्हा घरी सोडण्याची जबाबदारी माझीच असते. या सेवेमुळे देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान मला मिळत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या