मुंबई : लॉकडाउनच्या निमित्ताने चाळ, सोसायटीच्या गॅलरीत, इमारतीच्या गच्चीवर सध्या कॅरमचा खेळ चांगलाच रंगत आहे. यात गृहिणीसह ज्येष्ठ मंडळीही तितक्याच उत्साहाने सहभागी होत आहेत. मात्र यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भोईवाड्यामध्ये अशाच प्रकारे इमारतीच्या गच्चीवर एकत्र येत कॅरम खेळणाऱ्यांबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चौकडीवर बुधवारी अटकेची कारवाई केली आहे.पोलीस नाईक अरविंद कोंडीराम मोरे (४८) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असतानाही विनाकारण भटकणाऱ्यांची धडपड सुरू आहे. आतापर्यंत मुंबईत जमावबंदी, संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारपर्यंत तब्बल ९ हजार ३७३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ५ हजार ९१२ जणांना अटक करण्यात आली असून, २ हजार २२८ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहे. तर १ हजार १७९ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यातच मास्क न वापरलेल्यांविरुद्ध १,२०३ गुन्हे दाखल आहेत.परेल येथील किंजल व्हिलामध्ये काही तरुण कॅरम खेळत असल्याची तक्रार ४ एप्रिल रोजी भोईवाडा पोलिसांकडे करण्यात आली.पोलिसांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने याच इमारतीत राहणारे अभिजीत चंद्रकांत दुवाटकर (२८), मिथिल पारस जैन (२२), समीर अशोक राणे (४३), सोहन वासुदेव मायते (३०) या चौघांविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली. चौकशी दरम्यान, या मंडळींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यात समीर हा हार्डवेअर इंजिनीयर, तर मिथिल हा व्यावसायिक असून, अन्य दोघे नोकरी करतात. त्यामुळे तुमच्याविरुद्धही अशी कोणी तक्रार केल्यास, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते. म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन करत घरातच थांबणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.चाळीत होतोय टाइमपासतर जुन्या चाळी, सोसायटी, तसेच इमारतीच्या गच्चीवर एकत्र येत कॅरम, ल्युडो खेळणाºयांची चंगळ वाढत आहे. यात गृहिणीही काम उरकून सहभागी होताना दिसत आहेत.अशाच प्रकारे परेल येथील किंजल व्हिलामध्ये काही तरुण कॅरम खेळत होते़
CoronaVirus: सावधान... कॅरम खेळलात तर गुन्हा; भोईवाड्यात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 1:59 AM