मुंबई : अमली पदार्थ विरोधी विभागात काम करणाऱ्यापोलीस अमलदाराला रुग्णालयात दाखल करताच १० मिनिटात त्यांनी प्राण सोडले.प्रशासनाने मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यास विरोध केला. मात्र पत्नीला बाधा झाल्यावर कुटुबियांच्या मागणीनंतर तीन दिवसांनी गुरूवारी त्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे कुटुबियांचे म्हणणे आहे.
वरळीच्या बीडीडी चाळीत हे अमलदार पत्नीसोबत राहायचे. २९ जून रोजी श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे अवघ्या १० मिनिटात त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यात, नियमावर बोट ठेवत रुग्णालयाने मृत्यूनंतर चाचणी करण्यास नकार दिला. मात्र कुटुबियांच्या आक्रोशानंतर पत्नीची चाचणी करताच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पतीचा मृत्यूही कोरोनामुळेच झाल्याचा संशय कुटुबियांनी वर्तवला. जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुबियांनी घेतला. अखेर, गुरूवारी सकाळी चाचणी केली असून, अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांच्या मेव्हण्याने सांगितले. अहवाल आल्यानंतर शवविच्छेदन केल्याने रुग्णालयातच्या शवदाहिनीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.