मुंबई - कोरोना लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. तुम्ही केवळ एकच मदत करा, घरी बसा, असं आवाहन ठाकरे यांनी केलंय. तसेच, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये कोणाही अडथळा आणू नका, अनावश्यक प्रवास टाळा. पोलिसांना मी सांगतोय, आपण जगणं बदललं नाही, केवळ जगण्याची शैली बदललीय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी पोलिसांनाही सबुरीने घ्या, असा सल्ला दिलाय. तसेच, पोलिसांनी मास्क साठेबाजीवर टाकलेल्या धाडीचंही त्यांनी कौतुक केलंय. पोलिसांकडून अशाच कामाची आपल्याला अपेक्षा आहे, असेही मुख्यंमत्री ठाकरे यांनी म्हटलंय.
नागरिकांची सकाळी सकाळी मोठी धांदल उडत आहे. तर, पोलिसांकडून जीवनावश्यक वस्तू आणायला जातानाही अडवणूक होतेय, अशा काही तक्रारी कानावर आल्या आहेत. आपण जीवनावश्यक वस्तूंसाठी मालवाहतूक थांबवली नाही, तसेच शेतकरी आणि कृषीविषयक मालवाहतूक, अन्नधान्य वाहतूक आपण थांबवली नाही. त्यामुळे शेतीसंबंधित नागरिकांना सहकार्य करा, असे आवाहन ठाकरे यांनी पोलिसांना केले आहे. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या गाडीवर नावं टाकावेत व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, असेही ठाकरे यांनी म्हटलंय.
आपण, एकजुटीने संकटावर मात करतोय, सरकारी यंत्रणांवर ताण वाढेल असे काहीही करु नका. सर्वांनी घरी बसा, हे संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच, कोरोना संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावलेल्या सर्वांचे स्वागत करत असल्याचेही ते म्हणाले. शिर्डी साईबाबा संस्थान, सिद्धीविनायक मंदिर संस्था यांनी पुढाकार घेतलाय. तर, लालबागच्या राजाने रक्तदान शिबीराचे आयोजन करून या लढाईत योगदान दिलंय, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानले आहेत. केंद्र सरकारने विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, तसेच ३१ मार्चपर्यंत कर परतावा भरावा लागतो, ती तारीख वाढविण्याची विनंतीही केंद्र सरकारने मान्य केली. त्यामुळे, केंद्र सरकारचे धन्यवाद मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, कोरोनाचा व्हायरस जिथं आहे तिथंच त्याला संपवायचंय, त्यासाठी संचारबंदी केली असून सरकार खंबीर आहे, फक्त नागरिकांनी घरी बसावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.