Coronavirus: ‘त्या’ पोलिसाचा मृत्यू कोरोनामुळेच; चाचणी करण्याची कुटुंबीयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:30 AM2020-07-04T01:30:40+5:302020-07-04T06:53:27+5:30
कर्तव्यावर असताना एखाद्या पोलिसाचा कोरोना चाचणीअभावी मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी चाचणी होणे गरजेचे आहे.
मुंबई : अमली पदार्थ विरोधी विभागात काम करणारे ४० वर्षीय पोलीस अंमलदार यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे शुक्रवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे मृत्यूनंतरही पोलिसांची चाचणी होणे गरजेचे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वरळीच्या बीडीडी चाळीत पत्नीसोबत राहणारे पोलीस अंमलदार यांना २९ जून रोजी प्रकृती बिघडल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अवघ्या १० मिनिटांत त्यांना मृत घोषित करण्यात आले. सर्वांनाच याचा धक्का बसला. त्यात, कोरोनाची लक्षणे नसल्याने नियमावर बोट ठेवत रुग्णालयाने मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. कुटुंबीयांच्या आक्रोशानंतर पत्नीची चाचणी करताच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. पत्नीला बाधा झाली म्हणजे पतीचा मृत्यूही कोरोनामुळेच झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तवला. जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. अखेर, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यांच्या मेहुण्याने याबाबत ‘लोकमत’ला सांगितले.
कर्तव्यावर असताना एखाद्या पोलिसाचा कोरोना चाचणीअभावी मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी चाचणी होणे गरजेचे आहे. किमान घरातील कर्ती व्यक्ती गमावल्यानंतर शासनाच्या मदतीने ते दिवस काढू शकतील, असेही पोलीस कुटुंबीयांचे म्हणणे आहे.