CoronaVirus सकारात्मक! ८० वर्षीय महिलेची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:28 AM2020-04-10T07:28:12+5:302020-04-10T07:28:45+5:30
तिच्यामध्ये करोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून तिची चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिला रुग्णालयात दाखल केले.
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी ८० वर्षीय महिला कोरोनामुक्त होऊन पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे. देशासह राज्यात ६०-६५ आणि त्यापुढच्या वयोगटातील नागरिकांचे कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वयाची ८० गाठलेल्या महिलेने करोना विषाणूवर मात करणे, हे सकारात्मक संकेत असून इतरांसाठी एक आशेचा किरण आहे. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात विलगीकरण कक्षात आठवडाभर राहिल्यानंतर ही महिला मागच्या आठवड्यात कुटुंबीयांना भेटली़
आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, पण तिच्यामध्ये करोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून तिची चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिला रुग्णालयात दाखल केले. आई घरी येईपर्यंतचे दिवस तणावाचे होते. आता तिची प्रकृती सुधारत आहे, असे या ८२ वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाने सांगितले. ८० वर्षीय वृद्ध महिलेचे करोनामधून बरे होणे आमच्यासाठी आशेचा किरण आहे. करोना विषाणू म्हणजे वृद्धांसाठी फक्त मृत्यू नाही. या केसने आम्हाला आत्मविश्वास दिला, असे कोकिलाबेन रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
मुलुंड रुग्णालयातील तीन जण कोरोनामुक्त
मुलुंड येथील रुग्णालयातून कोविड-१९च्या दोन रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले. एक ३३ वर्षीय पुरुष रुग्ण व एक ३२ वर्षीय स्त्री अशा या दोन रुग्णांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली असून उपचारांच्या यशस्वी पूर्ततेनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी मुंबईचा रहिवासी असलेला ३३ वर्षीय पुरुष रुग्ण इंग्लंड येथून परतला होता. थंडी ताप, खोकला आणि धाप लागत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या या रुग्णाला २७ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुंबईच्या ३२ वर्षीय महिला रुग्णाला थंडी, ताप व कफचा त्रास जाणवू लागल्याने ३० मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणखी एका कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या चाचण्या करतेवेळी या महिलेला संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.