Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 02:42 AM2020-12-02T02:42:52+5:302020-12-02T02:43:04+5:30
मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात कोविशिल्डचा डोस देण्याचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला. केईएम रुग्णालयात १०१ स्वयंसेवकांना कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाईल. परंतु, यापैकी सहा जणांनी असमर्थता दर्शवल्याने ९५ स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ९५ स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्याने केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड प्रक्रिया पूर्ण झाल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. नायर रुग्णालयामध्ये या लसीचा पहिला डोस १४५ जणांना, दुसरा १२९ जणांना देण्यात आला आहे. १६ जणांना हे डोस देणे अद्याप बाकी आहे. लवकरच त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. या आठवड्यात सर्व डोस पूर्ण होतील, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.