Coronavirus: मास्कवरील विषाणू नष्ट करणे शक्य; कोरोनासंदर्भात प्राध्यापकांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:50 AM2020-05-07T07:50:22+5:302020-05-07T07:51:00+5:30

मुंबई विद्यापीठात अँटिव्हायरल नॅनो कोटिंग्स तयार

Coronavirus: possible to destroy the virus on the mask; Professor's research on corona | Coronavirus: मास्कवरील विषाणू नष्ट करणे शक्य; कोरोनासंदर्भात प्राध्यापकांचे संशोधन

Coronavirus: मास्कवरील विषाणू नष्ट करणे शक्य; कोरोनासंदर्भात प्राध्यापकांचे संशोधन

googlenewsNext

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांबरोबरच रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि
कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ
पाटील आणि स्वच्छ ऊर्जा अलायन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन पीपीई किट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित अँटिव्हायरल कोटिंग्स तयार केली आहेत.

विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टिकल्स बनवून ती तयार करण्यात आली आहेत. पीपीई किट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज भासते. तसेच वैद्यकीय प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करावा लागतो. यात कोटिंग्स तयार
करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, ही कोटिंग्स अवघ्या चार तासांत तयार करता येतात व ती १५ मिनिटांत वापरातदेखील आणली जाऊ शकतात, असे निरीक्षणात दिसून आले आहे. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या
या अँटिव्हायरल कोटिंग्सची पीपीई किट आणि एन-९५ मास्कच्या पॉलिमर्सवर याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली आहे.

या कोटिंग्सची कोरोना विषाणूंना मारण्याची क्षमता यावर लवकरात लवकर चाचण्या घेण्यात याव्यात, यासाठी दोन्ही संशोधक प्रयत्नशील आहेत. देशातील एकमेव बीएसल ३/४ पातळीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी, पुणे येथे ही कोटिंग्स तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकल्प डीएसटीला नुकताच सादर करण्यात आला आहे.

विद्यापीठ प्रयत्नशील
कोरोनाच्या प्रादुभार्वापासून बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सुरक्षेला प्राधान्य
सध्याच्या काळात डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने हे संशोधन केले असून लॉकडाउनच्या काळात सगळे नियम व्यवस्थित पार पाडून आम्ही या संशोधनाची प्रक्रिया पार पाडली आहे. - विश्वनाथ पाटील, प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ

Web Title: Coronavirus: possible to destroy the virus on the mask; Professor's research on corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.