Join us

CoronaVirus : राज्यात विनाव्यत्यय वीजपुरवठा सुरूच राहिला; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 11:25 PM

या यशाचं श्रेय डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि राज्यातील जनता आणि माध्यम प्रतिनिधींना दिले आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लाईट बंदच्या आवाहनाच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी रात्री 8 वाजून 39 मिनिटांपासून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे नागपूर नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. 9 मिनिटांच्या या अतिशय कठीण कालावधीत राज्यभरात विनाव्यत्यय वीज पुरवठा सुरू होता. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या यशाचं श्रेय डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि राज्यातील जनता आणि माध्यम प्रतिनिधींना दिले आहे.दर तीन मिनिटांनी डॉ राऊत स्वतः विजेच्या आकडेवारीची नोंद घेत होते. सुमारे 3 हजार मेगावाटचे नियोजन मागील 24 तासापासून ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले होते. रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी राज्याची विजेची मागणी 13377 मेगावाट इतकी होती. नंतर 8 वाजून 42 मिनिटांनी(13121MW), 8.54 वाजता (12857MW), 8.57 वाजता(12455 MW), 9 वाजता(11315 MW),  9.03 वाजता (10365 MW), 09.05 वाजता (10121MW), 09.07 वाजता (9983 MW), 9.09(9880MW), 9.12(10741MW) इतकी झाली होती.  सुमारे 3241 मेगावाटची घसरण झाली. या दरम्यान फ्रिक्वेन्सी 50.23 हर्टज इतकी महत्तम तर 50.09 हर्टज इतकी न्यूनतम नोंद करण्यात आली.या कालावधीत तिन्ही वीज कंपन्यांचे सुमारे 49,000 कर्मचारी मागील 24 तासांपासून जबाबदारी सांभाळून होते. वीज उत्पादनात कोयना जलविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी आणि पारस विद्युत केंद्रातून वीज उत्पादन सुरू होते. 9 मिनिटांच्या कालावधीत काही लोकांनी स्वेच्छेने लाईट बंद केली. विशेष म्हणजे मेन स्विच बंद केले नाही. याबद्दल डॉ राऊत यांनी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.

टॅग्स :नितीन राऊतकोरोना वायरस बातम्या