Coronavirus: 'गरिबांचं पोट भरण्यास प्राधान्य हवं, तो तांदुळ स्थलांतरीत मजुरांसाठी द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 11:39 AM2020-04-21T11:39:07+5:302020-04-21T11:39:26+5:30
केंद्र सरकारने देशातील प्राधान्य कल्याण गटातील सर्वच नागरिकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत दिला आहे. मात्र, स्थलांतरीत आणि परराज्यात अडकलेल्या मजुरांचे अद्यापही हाल होत आहेत
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊ सुरुच राहील, अशी घोषणा केली. त्यामुळे आणखी १२ दिवस देशातील जनतेला लॉकडाऊनच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. या लॉकडाऊन काळात मजूर, गरीब अन् स्थलांतरी नागरिकांची मोठी उपासमार होताना दिसत आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे सरकाने तादुंळापासून सॅनिटायझर बनविण्याचं ठरवलंय. सरकारच्या या निर्णयावरुन खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला पुनर्विचार करण्याच आवाहन केलंय.
केंद्र सरकारने देशातील प्राधान्य कल्याण गटातील सर्वच नागरिकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत दिला आहे. मात्र, स्थलांतरीत आणि परराज्यात अडकलेल्या मजुरांचे अद्यापही हाल होत आहेत. या मजुरांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. सरकारकडून या गरिबांना जेवण देण्यात येत आहे, पण अद्यापही या मजुरांचे हाल सुरुच आहेत. अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. एककीडे जेवणासाठी गरिबांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली सॅनिटायजरची गरज लक्षात घेऊन, सरकारने बफर स्टॉकमधी तांदुळापासून सॅनिटायजर बनविण्याचा निर्णय घेतला आहेय मात्र, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
''कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करीत असताना केंद्र सरकारने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतलाय.सॅनिटायजर आवश्यक आहे,त्याचे उत्पादन करायलाच हवे.
परंतु या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरीबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरीत मजूरांसाठी देऊ शकतो. @PMOIndia आपणास विनंती आहे की, या निर्णयाचा कृपया पुनर्विचार करुन तो तांदूळ गरीबांना वाटण्यासाठी उपलब्ध करावा,'' असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करीत असताना केंद्र सरकारने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतलाय.सॅनिटायजर आवश्यक आहे,त्याचे उत्पादन करायलाच हवे.
— Supriya Sule (@supriya_sule) April 21, 2020