coronavirus: स्थालांतरामुळे कामगार गावी, मनुष्यबळाअभावी मुंबईतील अनेक कारखान्यांमध्ये कामकाज ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:27 IST2020-06-10T17:26:27+5:302020-06-10T17:27:04+5:30
मुंबईतील व्यवहार हळूहळू अनलॉक होत असताना कामगारांच्या स्थलांतरामुळे नवी समस्या निर्माण झाली आहे.

coronavirus: स्थालांतरामुळे कामगार गावी, मनुष्यबळाअभावी मुंबईतील अनेक कारखान्यांमध्ये कामकाज ठप्प
मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या गावांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. या स्थलांतरादरम्यान या मजुरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता मुंबईतील व्यवहार हळूहळू अनलॉक होत असताना कामगारांच्या स्थलांतरामुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कारखाने आणि फॅक्टरीमध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याची सज्जता झाली आहे. मात्र एवढी तयारी करूनही कामगार या कारखान्यांमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये शुकशुकाट पसरलेला दिसत आहे.
यासंदर्भातील वृत्त आजतकने प्रकाशित केले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत कामगारांच्या वर्दळीमुळे गजबजलेल्या कारखान्यांमध्ये सध्या मोजकेच कामगार दिसत आहेत. याबाबत एका लघुउद्योगाचे मालक जगजित सिंह यांनी सांगितले की, माझ्या कारखान्यामध्ये २५ मजूर काम करतात. मात्र सध्या केवळ चार मजूर कामावर येत आहेत. बाकीचे मजूर आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यांना मी तीन महिन्यांचे वेतन दिलेय. मात्र ते घाबरलेले आहेत. मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. मात्र ते सध्यातरी मुंबईत येऊ इच्छीत नाहीत. सध्या जे मजूर काम करत आहेत, त्यांना माझ्या घरातून भोजन पाठवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मी त्यांना स्वत:च्या गाडीमधून त्यांनी ने आण करतोय. सध्याच्या परिस्थितीचा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सध्या केवळ ३० टक्केच व्यवयास होत आहे.
असाच प्रकार अजून ठाण्यातील एका फूड फॅक्टरीमध्ये दिसून आला आहे. प्रशांत कॉर्नर फूड नावाच्या या फॅक्टरीत मिठाई तयार केली जाते. या फॅक्टरीचे एकूण ६ आऊटलेट्स आहेत. त्यांची दुकाने एका दिवसापूर्वीच उघडली आहेत. मात्र त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येत आहे. येथील एका युनिटमध्ये दिवसाला १०० जण काम करतात. मात्र सध्या केवळ १० जण कामावर उपस्थित होते. याबाबत कंपनीचे मालक प्रशांत सकपाळ यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सध्या कामगारांची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे. माझ्याकडे एकूण ६०० मजूर काम करत होते. मात्र आता त्यापैकी केवळ १०० जण उरले आहेत. त्यांच्या भरवशावर काम करावे लागत आहे. त्यातच सध्याच्या परिस्थितीत केवळ १० ते २० टक्केच धंदा होत आहे. पुढच्या काळात सगळे काही स्थिरस्थावर होईल, अशी अपेक्षा आहे.