Join us

Coronavirus: आयआयटी बॉम्बेकडून यूव्ही सॅनिटायझरची निर्मिती; निर्जंतुकीकरणासाठी वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:31 AM

रोबोटिक यूव्ही सॅनिटायझर निर्मितीचाही विचार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजकाल प्रत्येक गोष्ट निर्जंतुकीकरण करून वापरणे गरजेचे झाले आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेल्या मोठ्या ठिकाणचे केमिकलच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करणे जिकिरीचे ठरते. यावर उपाय म्हणून आयआयटी बॉम्बेच्या संशोधक प्राध्यापकांनी यासाठी यूव्ही सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे यूव्ही सॅनिटायझर पोर्टेबल असून ते कोणत्याही ठिकणावरील नाजूक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरता येणार आहे.

आयआयटी बॉम्बेच्या हॉस्पिटल्समध्ये सध्या या उपकरणाचे नमुने प्राथमिक तत्त्वावर हॉस्पिटल्समधील विविध उपकरणे सॅनिटाइझ करण्यासाठी दिले आहेत. बायोसायन्स अ‍ॅण्ड बायोइंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक अंबरीश कुमार आणि प्राध्यापक किरण कोंडाबागील यांनी प्रोयोगिक तत्त्वावरील यूव्ही सॅनिटायझरच्या या उपकरणाची निर्मिती केली असून विषाणूंच्या निर्जंतुकीकरणासाठी हे उपकरण प्रमाणित केले आहे. मोठ्या जागांसह ज्या जागांवर पोहोचता येणे शक्य होत नाही अशा जागा निर्जंतुक करता येणार आहेत. हे उपकरण वापरताना रिमोट कंट्रोलचा वापर करून नियंत्रित करता येणार आहे. तसेच पीपीई किट्स घालून याद्वारे यूव्ही रेडिएशन करता येणार आहे.

या पोर्टेबल यूव्ही सॅनिटायझरनंतर या प्राध्यापकांच्या टीमचा याचे रोबोटिक व्हर्जन तयार करण्याचाही विचार आहे. रोबोटिक यूव्ही सॅनिटायझर यापेक्षाही अधिक सक्षम असणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील मेट्रो किंवा बसेसमधील सीट्स, एअरक्राफ्ट्समधील सीट्स यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयोगात आणता येईल. अशा सॅनिटायझरचा उपयोग केवळ हॉस्पिटल्समध्येच नाही, तर एअरपोटर््स, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स यांसारख्या ठिकाणी करता येऊ शकतो.

टॅग्स :आयआयटी मुंबईकोरोना वायरस बातम्या