CoronaVirus: घर खरेदीचे स्वप्न लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:57 AM2020-04-29T05:57:07+5:302020-04-29T05:57:33+5:30
कोरोना संकटानंतर घरांच्या किंमती कमी होतील, अशी अनेकांना आशा असून ९० टक्के ग्राहकांनी तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
मुंबई : बांधकाम व्यावसायिक घरांच्या खरेदी-विक्रीला वेग देत आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्नशील असताना संभाव्य गृह खरेदीदारांनी घर खरेदीचे स्वप्न लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटानंतर घरांच्या किंमती कमी होतील, अशी अनेकांना आशा असून ९० टक्के ग्राहकांनी तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
लॉकडाउनपूर्वी घर खरेदीसाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, चंदिगड, अहमदाबाद अदी शहरांतील सुमारे १८०० लोकांशी चर्चा करून बांधकाम क्षेत्रातील सल्लागार संस्था असलेल्या ९९ एकर्स डॉट कॉम यांनी सर्वेक्षणाअंती अहवाल तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. अहवालानुसार, ४० टक्के संभाव्य ग्राहकांनी घर खरेदीचे स्वप्न अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकले आहे. तर, उर्वरित ६० टक्के ग्राहकांची घर खरेदीची इच्छा कायम आहे.
मात्र, त्यासाठी किमान वर्षभर प्रतीक्षा करण्याची त्यांची तयारी आहे. आर्थिक आघाड्यांवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ५६ टक्के लोकांना सध्या घर घेणे व्यवहार्य वाटत नाही. तर, ३० टक्के संभाव्य ग्राहकांवर आर्थिक अरिष्ट कोसळण्याची चिन्हे असल्याने त्यांनी आपला प्राधान्यक्रम बदलला आहे. कोरोनामुळे केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक चटके सोसावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांनी गृह खरेदीचे आपले स्वप्न लांबणीवर टाकल्याचे हा अहवाल सांगतो.
<किंमती कमी होण्याची दाट शक्यता
रेरा, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत गृह खरेदीला घरघर लागली असून कोरोनाच्या संकटामुळे त्यापेक्षाही जबरदस्त तडाखा बांधकाम व्यवसायाला बसला आहे. या संकटामुळे व्यवसायाला एक लाख कोटींचे नुकसान सोसावे लागेल, असा अंदाज या क्षेत्रातील नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केला. तर, बांधकाम पूर्ण झालेली घरे तातडीने विका आणि आर्थिक संकटाची धार कमी करा, असा सल्ला एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिला होता. एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी तर घरांच्या किंमती २० टक्क्यांपर्यंत कमी होतील, असे भाकीत व्यक्त केले होते.
>रिअल इस्टेटमध्येच गुंतवणुकीला प्राधान्य
३१ टक्के लोकांना आजही बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक सुरक्षित आणि व्यवहार्य वाटते. तर, फिक्स्ड डिपॉझिट (२४ टक्के), सोने (२४ टक्के) आणि शेअर्स (२१ टक्के) गुंतवणूक योग्य वाटत असल्याचे अहवालात नमूद आहे.