CoronaVirus : लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना मोफत जेवण आणि जादा गणवेश द्या; एसटी कर्मचारी संघटनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:53 PM2020-04-03T16:53:30+5:302020-04-03T16:54:00+5:30
लॉकडाऊन काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण आणि जादा गणवेश देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेद्वारे केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून बस सेवा सुरु आहे. मात्र हि सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. कमी गणवेश असल्याने अस्वच्छ गणवेश घालावा लागतो. त्यामुळे लॉकडाऊन काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण आणि जादा गणवेश देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेद्वारे केली आहे.
एसटी महामंडळाकडून पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, महापालिका, मंत्रालयातील कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. एसटी महामंडळाकडून सुमारे २०० एसटी बस चालविल्या जात आहेत. मात्र हि सेवा देणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यांना जेवणाची योग्य व्यवस्था नाही. आपला जीव धोक्यात टाकून एसटी कर्मचारी सेवा देत आहे, त्यामुळे त्यांना मोफत जेवण आणि जादा गणवेश देण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कॉंग्रेस या संघटनेने केली आहे. या संदर्भात पत्र एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, 24 मार्चपासून लॉक डाऊन करण्यात आले. त्यामुळे रेल्वे व अन्य वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. मात्र एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवासाठी मुंबई, ठाणे व पालघर या तिन्ही विभागातून एकूण २०० एसटी बस सुरु करण्यात आल्या. या एसटी बसवर सुमारे 600 चालक, वाहक व अन्य संबंधित कर्मचारी कामगिरीवर आहेत. एसटी महामंडळाकडून पुरविण्यात आलेल्या मास्क आणि सॅनिटायझर दर्जा चांगला नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीचे हातमोजे, मास्क द्यावेत. या कालावधीत दररोज कपडे स्वच्छ धुवून वापरण्याची गरज असल्याने एखादा जादा गणवेश, मोफत जेवणाची व्यवस्था करावी, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे
-------------------------------
लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद
लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल बंद आहेत. एसटी महामंडळातील कॅन्टींग सुरु आहे. मात्र उपहारगृहात काम करणारे कर्मचारी कामावर न आल्यामुळे कॅटिंगमध्ये वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या कामगारांना जेवणासाठी गैरसोय होते. दररोजची अडचण असल्याने एसटीतर्फे स्थानकावरील उपाहारगृहात मोफत जेवण देण्याची मागणी सुद्धा महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेने केली आहे.