Coronavirus: दिल्लीत सहभागी १२७ पैकी १०५ जण क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:13 AM2020-04-03T02:13:25+5:302020-04-03T06:38:08+5:30
मुंबईतील कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढतोय, त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे नवे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.
मुंबई : दिल्ली येथील धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या १२७ इतकी आहे. त्यातील १०५ जणांना पालिकेच्या आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे. तर अन्य नागरिकांचा शोध सुरु असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईतील कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढतोय, त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे नवे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे. शहर उपनगरातील १९५ विभाग पालिका प्रशासनाने सील केले आहेत. राज्यात गुरुवारी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ते सर्व रुग्ण मुंबईतील होते.
मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील २० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करत त्यांची कोरोना तपासणीसाठी स्वाब नमुने घेण्यात आले होते. मात्र येथील सर्वांची स्वाब नमुने कोरोना निगेटीव्ह आल्याची माहीती मिळत आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.शनिवारच्या दरम्यान नायर रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यात आले.
सोमवारी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. हे समजल्यावर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांकडे चौकशी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यात एक परिसेविका व १० परिचारिका अशा ११ जणी होत्या. तर इतर कर्मचारी मिळून
कूण २० जण असल्याचे समजले. या सर्वांना त्वरीत क्वारंटाईन करण्यात आले. याच दरम्यान त्या सर्वांचे स्वाब नमुने घेण्यात आले. गुरुवारी हे नमुने कोरोना मुक्त असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान केईएम रुग्णालयातही एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या दोन परिचारिकांना क्वारंटाईन करावे लागले होते. तर विक्रोळी येथील परिचारिकेलाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसाराची चिघळणारी स्थिती पाहता आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाºयांना सुरक्षेसाठी मास्क, पीपीई किट्स मिळावेत यासाठी कर्मचारी संघटनाही पुढे सरसावत आहेत.