मुंबई : लॉकडाउनच्या काळात मद्यविक्री बंद होती. मात्र त्यानंतर आता मद्यविक्रीचा निर्णय सरकारने घेतल्याने मुंबईतील मद्यपींनी सोमवारी सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा लावल्या. मात्र आदेश न आल्याने गोंधळ होता. अनेक ठिकाणी दुपारी उशिरापर्यंत दुकाने सुरू न झाल्याने मद्यपींमध्ये नाराजीचे वातावरण होते.
मद्य दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला खरा, मात्र सोमवारी दुपारपर्यंत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश आलेले नसल्याने मद्यपींमध्ये धाकधूक होती. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मद्यविक्रीचे निर्देश मिळवण्यासाठी बैठका सुरू होत्या. दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर मद्यविक्री सुरू करण्यात येईल, असे मुंबई शहरचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी सांगितले.
दरम्यान, सकाळी दुकान उघडण्यापूर्वीच शिवडी, परळ, भोईवाडा, माहिम, माटुंगा अशा मुंबईतील अनेक ठिकाणी ग्राहकांनी दुकानांबाहेर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गोंधळ झाल्याचे चित्र होते. निर्देश आल्यानंतर पूर्ण क्षमतेने मद्यविक्री सुरू झाली.प्रशासनाच्या कारभारावर व्यक्त केली नाराजीस्पष्ट निर्देश नसल्याने शिवडी, परळ, भोईवाडा, लालबाग यासह मुंबईतील अनेक ठिकाणी दुकान उघडण्यास चालकांनी नकार दिला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी वाइन शॉप परिसरात धाव घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तर, मद्यविक्रीचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी त्वरित करण्याची गरज होती, मात्र प्रशासनाच्या लेटलतिफीमुळे मद्यप्रेमींना मद्य प्राशन करण्यापासून वंचित राहावे लागले, अशी नाराजी एका मद्यपीने व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मद्यविक्रीचे निर्देश कोणत्याही क्षणी येऊ शकतात व मद्य विक्री सुरू होऊ शकेल या आशेवर अनेकांनी कडक उन्हातही भल्यामोठ्या रांगेतील आपला क्रमांक काही शेवटपर्यंत सोडला नाही. दुपारी निर्देश आल्यानंतर त्यांना मद्य मिळाले आणि त्यांच्या चेहºयावर स्मितहास्य झळकले.असे आखले बेत : २२ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. मद्यविक्री बंद झाली. सव्वा महिन्याचा हा अनुशेष भरून काढण्याचे पूर्ण नियोजन मद्यपींनी केले आहे. सोमवारी दुपारपासून अनेकांनी घरातल्या घरात, इमारतीच्या प्रांगणात, छतावर बसून मद्यप्राशनाचा आनंद लुटला. काहींनी रात्री मद्यप्राशनाचे बेत बनवले व त्यासोबत चिकन व इतर वस्तू जमवण्यावर भर दिला.