मुंबई : कोरोना आजारावर परिणामकारक ठरणाºया टोसिलिझुमॅब या इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी घाटकोपर येथे मागील तीन ते चार दिवसांपासून नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या इंजेक्शनची देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी असून अनेक डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन आणण्यास सांगत आहेत.ज्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी घाटकोपर येथील एका वितरकाच्या दुकानाबाहेर २४ तास रांग लावून उभे आहेत. सध्याच्या स्थितीत या इंजेक्शनची महाराष्ट्रात उपलब्धता कमी असल्यामुळे मुंबईबाहेरील जिल्ह्यांमधूनदेखील अनेक जण या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत. वितरकाच्या दुकानाबाहेर हजारोंच्या संख्येने गर्दी जमल्याने येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. त्यात रुग्णाचे नातेवाईक कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.या इंजेक्शनची किंमत ४0 ते ४५ हजार रुपयांच्या घरात आहे. परंतु नाइलाजास्तव रु ग्णांच्या नातेवाइकांना या ठिकाणी रांगेत उभे राहून हे इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. सरकारने या इंजेक्शनचे उत्पादन वाढवून हे देशभरात सगळीकडे असणाºया मेडिकल व सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करावे. तसेच या इंजेक्शनची जास्त असणारी किंमत कमी करण्यावर भर द्यावा, असे इंजेक्शन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मत आहे.
coronavirus: कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी रांगा, चेंबूरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 3:08 AM