Coronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:02 PM2020-04-05T16:02:49+5:302020-04-05T16:03:26+5:30
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील
मुंबई - कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देशासाठी अन् विशेषत: राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. मात्र, राज ठाकरेंच्या गोळ्या घालण्याच्या भाषेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. तसेच, राज ठाकरेंसारख्या जबाबदार नेत्याला अशी असंवैधानिक भाषा शोभत नसल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे.
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल. वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल पोलिसांचं अभिमंदन करतो. या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल असं त्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत मरकज कार्यक्रमाचा समाचार घेत, गोळ्या घालण्याची भाषा केली. मात्र, केंद्रीय मंत्री आणि रिपलब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनी राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सरख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्यांना घाला . pic.twitter.com/Kz1DECnqJq
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 5, 2020
राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सरख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्यांना घाला, असे ट्विट रामदास आठवलेंनी केले आहे. विशेष म्हणजे तबलिगींच्या गर्दीचे आम्ही समर्थन करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.