CoronaVirus: मेट्रो शहरांसह ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वेगाने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:23 AM2020-04-29T06:23:27+5:302020-04-29T06:23:54+5:30
राज्यातील केवळ एकाच वर्ध्या जिल्ह्यात कोरोना पोहोचला नसून अन्य सर्व जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून स्थिती चिंताजनक होते आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक भीषण होते आहे. राज्यातील केवळ एकाच वर्ध्या जिल्ह्यात कोरोना पोहोचला नसून अन्य सर्व जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून स्थिती चिंताजनक होते आहे. मुंबई, पुणे, नागपूर शहर, औरंगाबादमध्ये, मराठवाड्यात, नाशिक जिल्ह्यात, मालेगावमध्ये मागील दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
मुंबईतही कोरोना वेगाने पसरतो आहे. मंगळवारी शहर उपनगरात ३९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने ६ हजार १६९ चा टप्पा गाठला आहे. तर दिवसभरात २५ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २४४ वर पोहोचला आहे.
धारावीत कोरोनाचा धोका वाढत आहे. मंगळवारी तब्बल ४२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाच दिवसात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णसंख्या ३००हून अधिक झाली आहे. नवी मुंबईतही एकाच दिवशी ४३ रुग्ण वाढले असून येथील रुग्णसंख्या १८८ झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी हाजीअली स्थित नॅशनल स्पोटर््स कॉम्प्लेक्स आॅफ इंडिया येथे ५०० खाटांची संपर्करहित सुविधा उभारण्याचे काम पालिकेने अवघ्या पाच दिवसांमध्ये पूर्ण केले आहे.