Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठी परवानगी नाही, ‘आयसीएमआर’ने दिले थांबवण्याचे आदेश

By अतुल कुलकर्णी | Published: April 26, 2020 06:21 AM2020-04-26T06:21:37+5:302020-04-26T06:22:09+5:30

तपासणी सुरू करण्याआधीच केंद्र सरकारने टेस्ट थांबवण्याचेही आदेश दिले. त्यामुळे या टेस्ट महाराष्ट्रात सुरूच केल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Coronavirus : Rapid test of corona is not allowed in the state, ICMR orders to stop | Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठी परवानगी नाही, ‘आयसीएमआर’ने दिले थांबवण्याचे आदेश

Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठी परवानगी नाही, ‘आयसीएमआर’ने दिले थांबवण्याचे आदेश

Next

अतुल कुलकर्णी 
मुंबई : आयसीएमआरने कोरोना टेस्ट करण्यासाठी महाराष्ट्राला ७६,८०० किट पाठवले, मात्र वेगवेगळ्या राज्यांमधून त्याविषयी तक्रारी आल्यानंतर या टेस्ट थांबवण्याचे आदेश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आमच्याकडे केंद्र सरकारने रॅपिड टेस्टसाठी किट पाठवले होते. मात्र त्याची तपासणी सुरू करण्याआधीच केंद्र सरकारने टेस्ट थांबवण्याचेही आदेश दिले. त्यामुळे या टेस्ट महाराष्ट्रात सुरूच केल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत शुक्रवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र अद्याप त्याविषयी स्पष्टता नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. याविषयी आयसीएमआर पुढील आदेश देणार आहेत. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, आयसीएमआरने अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. मात्र काही अटी-शर्थी घालून आम्हाला त्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यासंबंधीचा आदेश अद्याप राज्य शासनाला मिळालेला नाही. रॅपिड किटविषयी राजस्थान आणि पश्चिम बंगालने तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी देशभर ही तपासणी थांबविण्यात आल्याचे आयसीएमआरने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. दरम्यान, आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार चीनचे रॅपिड टेस्टिंग किट सदोष असल्यानं दोन दिवस त्यांचा वापर न करण्याची सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) राज्यांना २१ एप्रिलला केली होती. दुसऱ्या दिवशी आयसीएमआरने राज्य सचिवांना पत्र लिहून निर्देशित वैद्यकीय पद्धतीनुसारच(प्रोटोकॉल) रॅपिड टेस्टिंग किट वापरण्याचे निर्देश दिले होते. आयसीएमआरचे अव्वर महासंचालक डॉ. जी. एस. टोटेजा यांनी हे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, काही राज्यांनी रॅपिड  टेस्ट संदर्भात तक्रारी केल्या. यासंदर्भात १७ एप्रिल रोजी टेस्ट वापराची पद्धत, उद्देश आम्ही कळवले आहेत. रॅपिड टेस्टचा उद्देश मर्यादित असून कोरोनासाठी आरटी-पीसीआर चाचणीला पर्याय नाही. तरीही आम्ही राज्यांकडून माहिती घेत आहोत. ठरलेला प्रोटोकॉल वापरून निर्धारित उद्दिष्टांसाठी ही टेस्ट वापरावी. मात्र कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीच करण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Coronavirus : Rapid test of corona is not allowed in the state, ICMR orders to stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.