coronavirus: पुन्हा झालेले लॉकडाऊन, निर्बंधांमुळे राज्यातील अर्थकारण बिघडले, रोजगारांवर गदा, उद्योगधंदेही अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:45 AM2020-07-05T05:45:10+5:302020-07-05T06:41:14+5:30
दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊ न असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, विविध शहरे व जिल्ह्यांत रोज नवे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊ न, संचारबंदी व अधिक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारतर्फे ही पावले उचलण्यात येत असली त्यामुळे राज्याचे अर्थकारण अधिकाधिक बिघडत चालले आहे. या निर्बंधांमुळे उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे.
दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊ न असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना आवश्यकच आहेत. पण सर्वच बंद केल्याने आमचे रोजगार गेले आहेत, त्यामुळे हातात पैसा नाही, अशी कामगार व मजुरांची तक्रार आहे, तर उद्योग बंद ठेवण्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आम्ही उद्योग, व्यवसाय बंद केल्याने कोरोनाची लागण थांबणार का, असा त्यांचा सवाल आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथे रेल्वेही उपलब्ध नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कारखाने, बांधकाम व्यवसाय, दुकाने, धंदे, बंद आहेत. परप्रांतीय कामगार गावी गेले आहेत आणि स्थानिक कामगारांना जाण्यावर निर्बंध आले आहेत. अनेक वस्तूंच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. तसेच उद्योग बंद असल्याने उत्पादनही ठप्प झाले आहे, असे अनेकांनी बोलून दाखविले. घरी बसलेल्या कामगारांना पगार द्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. पण जे सरकारलाच शक्य नाही, ते आम्ही कसे करणार, असे अनेकांनी बोलून दाखविले.
सोलापूरमध्ये मात्र पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करा, अशी मागणी तेथील काही ज्येष्ठ मंडळींनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी केली केली. परिस्थिती पाहण्यासाठी ते आले होते. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करावीच लागेल; पण पाच दिवस आधी त्याची पूर्वकल्पना दिली जाईल, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मुंबईत बुधवारपासून संचारबंदी लागू आहे. पनवेलमध्ये ३ ते १३ जुलै, नवी मुंबईत ४ ते १३ जुलै, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूरमध्ये २ ते १२ जुलै, मीरा-भार्इंदरमध्ये बुधवार १ जुलैपासून तर नवी मुंबईत ४ ते १३ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन आहे. ठाण्यात ३१ जुलैपर्यंत मनाई आदेश आहे.
ठाणे जिल्ह्यात २ ते ११ जुलैपर्यंत निर्बंध आहेत. मराठवाड्यात बीड व परभणी येथे संचारबंदी लागू असून, औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसीमध्येही कामगारांव्यतिरिक्त इतरांना जाण्यावर निर्बंध आहेत. औरंगाबाद शहरात १0 जुलै ते १९ जुलै या काळात कडक निर्बंध लादले जाणार आहेत.
पगार, भाडे कसे देणार?
ठप्प झालेला व्यवसाय जूनमध्ये पूर्वपदावर आला होता. लॉकडाऊन वाढविल्यामुळे पुन्हा व्यवसाय बंद पडले आहेत. केवळ १२ दिवस दुकाने खुली राहत आहेत, पण वीज बिल ,कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे द्यावे लागत आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने लॉकडाऊन राबवून दुकानेही सुरू ठेवावीत.
- विरेन शाह, अध्यक्ष ,फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष
...तर रोजगार मिळेल
जूनमधील जीएसटी कलेक्शन पाहिले तर औद्योगिक स्थिती सुधारत आहे. राज्यात २० लाख उद्योग-व्यवसाय असून ८० हजार सुरू आहेत. सात ते साडे सात लाख उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यास रोजगार उपलब्ध होईल, पुरवठा साखळी सुधारेल.
- चंद्रकांत साळुंखे, संस्थापक आणि
अध्यक्ष, एसएमई चेंबर आॅफ इंडिया
कोरोनाचा संकटकाळ सुरू झाला त्यावेळी आपल्याकडे वैद्यकीय उपकरणांची अन्यथा इतका प्रादुर्भाव झाला नसता.मात्र, मात्र आतापर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणे उचित नाही. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. सगळे खुले करा असे म्हणणार नाही. काही भाग सील करणे, विशिष्ट वेळांमध्ये लॉकडाउन करणे हे पर्याय असू शकतात. इतक्या दिवसांच्या लॉकडाऊनमुळे लोकांमध्येही निराशेची भावना आहे. नोकऱ्या जात आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी व समाजातील एकूणच निराशेची भावना दूर करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. - देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते.
अर्थचक्राला गती यायलाच हवी, पण कोरोनाही नियंत्रणात राहायला हवा. अनलॉकमध्ये लाखो लोक घराबाहेर पडले. सर्व नियम मोडले गेले. त्यामुळे संक्रमण वाढले.त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावे लागले तर चुकीचे काहीच नाही.
- अनिल देशमुख, गृहमंत्री
अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अनेक महिन्यांपासून लोक घरी आहेत. आपण कोरोनाला कंटाळलो असलो तरी कोरोना कंटाळलेला नाही. त्यामुळे लोकांनी सरकारला सहकार्य करावे.
- आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री