कोरोनाच्या लसीसाठी केईएम, सायन रुग्णालयात कर्मचाऱ्यांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:44 AM2020-10-29T02:44:14+5:302020-10-29T02:45:13+5:30
corona virus News : राज्य शासनाने पालिका प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. केंद्र शासनाने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ या समूहाची निर्मिती केली आहे.
मुंबई : राज्य शासन व पालिकेने कोरोनाच्या लसीकरिता आता शहर, उपनगरातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता, केईएम आणि सायन रुग्णालयात जवळपास आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून जानेवारी २०२१मध्ये या ‘कोविड योद्ध्यांना लसीकरणाच्या प्रक्रियेत आणण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली.
राज्य शासनाने पालिका प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. केंद्र शासनाने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ या समूहाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून लस देण्यात येणाऱ्या विविध लोकसंख्या समूहांविषयी महत्त्वाची धोरणे ठरविण्यात येत आहेत. तसेच, लसीकरण प्रक्रिया, अंमलबजावणी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट या सर्व प्रक्रिया समूहाच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहेत. केंद्राच्या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून देण्यात येईल.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती पालिका प्रशासन घेत आहे. यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि पॅरामेडिकल कर्मचारी मिळून जवळपास एक लाख व्यक्तींची माहिती जमा करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल आयडी तयार करण्याचाही प्रयत्न आहे.
पालिकेच्या रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले, नायर रुग्णालयात अडीच हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. यात कर्मचाऱ्यांचे नाव, पत्ता आणि अतिजोखमीच्या आजारांची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय, सायन आणि केईएम रुग्णालयात एकत्रितरीत्या आठ हजार व्यक्तींनी नोंद केली आहे.