coronavirus: ३० जूनपर्यंतची आरक्षित तिकिटे रद्द, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:24 AM2020-05-15T00:24:02+5:302020-05-15T00:24:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेनंतर देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या टप्प्यात काही नवीन नियम लागू करण्यात येतील.
मुंबई : कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत आरक्षित केलेली तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जून अखेरपर्यंत आरक्षित सर्व तिकिटांची रक्कम प्रवाशांना परत केली जाईल. मात्र या कालावधीत सर्व विशेष ट्रेन्स आणि श्रमिक स्पेशल एक्स्प्रेस आधीप्रमाणेच सुरू राहतील, त्यांची तिकिटे रद्द करण्यात आली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेनंतर देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या टप्प्यात काही नवीन नियम लागू करण्यात येतील. त्याबद्दल लवकरच केंद्राकडून निर्देश जाहीर केले जातील. मात्र, त्याआधीच रेल्वेने थेट ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचे आरक्षण रद्द केले. रेल्वेने आधी १७ मेपर्यंत ट्रेनची तिकिटे रद्द केली होती. आता ही मुदत वाढवून ३० जून केली.
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली विशेष ट्रेनला जादा डबा
प्रवाशांच्या सोयीसाठी आता मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली विशेष ट्रेनला जादा डबा जोडण्यात येईल. रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील काही प्रमुख मार्गावर विशेष ट्रेन चालविण्यास सुरुवात केली आहे. या ट्रेनने दिल्लीहून मुंबईला १ हजार ७२ प्रवासी आले. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे, ५ द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहेत. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने आता मुंबई सेंट्रलहून १५ ते १९ मे आणि नवी दिल्लीहून १६ ते २० मे दरम्यान धावणाऱ्या गाडीला अतिरिक्त डबा जोडण्यात येईल.
परताव्यासाठी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक
ज्या प्रवाशांनी तिकिटे आॅनलाइन आरक्षित केली आहेत त्यांच्या बँक खात्यात परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे पाठविण्यात येते. मात्र, तिकीट खिडकीवरून तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना आरक्षण केंद्रे बंद असल्यामुळे पैसे परत घेण्यास अडचणी येतात. त्यासाठी भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) नवीन योजना आखली आहे. त्यानुसार रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर उपलब्ध असलेले पर्याय वापरताच परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे प्रवाशाच्या खात्यात वळती होईल, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.