मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक कोविड योद्धे म्हणून समोर आले त्यांचा मुंबईत राखीव दल निर्माण करण्यात येत आहे. गरज पडेल तिथे या दलाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे.राज्यभरात तब्बल २१,०१९ कोविड योद्धांंनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यातील ३,५५६ योद्धे एकट्या मुंबईतील आहेत. त्यात डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थाआदीचा समावेश आहे. सेवानिवृत्तांसह सेवेतील लोकांनी यासाठी तयारी दर्शविली.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी त्यांची सेवा कशी घेता येईल आणि ती घेण्यापूर्वी त्यांना कुठले प्रशिक्षण द्यायचे याची योजना तयार करण्यात आली आहे आणि त्यानुसार प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, तसेच त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील योद्धांची नावे, पत्ता, मोबाइल क्रमांकासह माहिती देण्यात आली आहे.मुंबई खालोखाल पुण्यात २७२०, ठाण्यात २०१३, नाशिकमध्ये १०५६, अहमदनगर मध्ये ९३४, औरंगाबादमध्ये ७३३, नागपुरात ५२१, तर बीड जिल्ह्यात ६०४ कोविड योद्धे आहेत. त्याशिवाय २७ जिल्ह्यांमध्ये असे येथे समोर आले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी त्यांच्या सेवा कशा घ्यायच्या याबाबतचे नियोजन मंत्रालयातील कोरोना नियंत्रण कक्षात कार्यरत प्रधान सचिव भूषण गगराणी करीत आहेत. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सहकार्याने मुंबईतील समन्वयाची जबाबदारी सचिव प्राजक्ता लवंगारे सांभाळत आहेत.कोविड योद्ध्यांना केंद्र सरकारच्या आॅनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण देण्याचे काम आरोग्य विभाग करीत आहे. मुंबईत हे योद्धे जेथे राहतात शक्यतो त्याच वॉर्डात त्यांची सेवा घेण्यात येत आहे. त्यांच्या जोडीला विद्यापीठाच्या राष्ट्र सेवा योजनेचे तसेच नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते यांचीही मदत घेतली जात आहे. जेवणाचा भोजनाचा पुरवठा, क्वारंटाइनबाबत काळजी, देखरेख याबाबत त्यांना मार्गदर्शन करून लगेच सक्रिय करण्यात आले आहे.>वाटप होणाºया भोजनावर एफडीएची नजरमुंबईत सध्या विविध संस्था संघटनांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी कम्युनिटी किचनमध्ये भोजन तयार केले जाते. तेथील भोजनाची गुणवत्ता तपासण्याचे काम आता अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे देण्यात आले आहे. सर्व कम्युनिटी किचनचे एक मोबाइल अॅप तयार करण्यात येत आहे. त्या माध्यमातून भोजनाचा पुरवठा किती आणि कुठे केला जातो हे लगेच कळेल आणि कोणी भुकेला राहणार नाही हेही बघितले जाईल, अशी माहिती प्राजक्ता लवंगारे यांनी दिली.
coronavirus : कोविड योद्धांचे मुंबईत राखीव दल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:00 AM