Coronavirus : निर्बंधांतून वृत्तपत्र विक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवांना वगळले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:18 AM2020-03-23T02:18:03+5:302020-03-23T07:02:31+5:30
बँकिंग, वित्त सेवा, भाजीपाला, दूध, फळे, रुग्णालये, पोर्टस, फोन, इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, आॅइल, वीज यासोबत अत्यावश्यक सेवेत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्र विक्रेते यांचा समावेश असल्याचे टोपे म्हणाले.
मुंबई : अत्यावश्यक सेवांमध्ये प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी स्पष्ट केले. बँकिंग, वित्त सेवा, भाजीपाला, दूध, फळे, रुग्णालये, पोर्टस, फोन, इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, आॅइल, वीज यासोबत अत्यावश्यक सेवेत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्र विक्रेते यांचा समावेश असल्याचे टोपे म्हणाले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत लॉक डाऊन करण्यात येणार आहे. या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असणार आहेत. लॉक डाऊनमधून प्रसार माध्यमांसह वृत्तपत्र विक्रेत्यांनाही वगळण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी गाड्यांना विशेष प्रकारचे स्टीकर दिले जातील. याशिवाय या आस्थापनांत काम करणाºया व्यक्तींना पासेस दिले जातील. स्टीकर असलेली वाहने आणि पासधारकांनाच प्रवास करता येणार असल्याचे मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. लोकांचे आरोग्य आणि जनहितामुळे असा निर्णय घ्यावा लागत असून कोणी याचा गैरफायदा घेऊ नये, असे त्यांनी नमूद केले.