Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:47 AM2021-05-28T06:47:36+5:302021-05-28T06:50:35+5:30

राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील. 

Coronavirus: Restrictions in the state will be relaxed! The lockdown will continue; New regulations soon | Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच

Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच

Next

मुंबई : राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील. 

त्यानंतर एक-दोन दिवसांत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय निर्बंध वेगवेगळे असतील, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन कायम ठेवावा पण निर्बंध शिथिल करावेत अशी भूमिका मांडली. राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवायचे असेल तर कडक लॉकडाऊन परवडणार नाही. निर्बंधांमुळे व्यापारावर विपरित परिणाम झाला असून लोक आता लॉकडाऊन नको असे म्हणत आहेत. व्यापारी वर्गाचाही मोठा दबाव आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनबाबत फेरविचार करण्याची विनंती मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. 

निर्बंध कमी कसे करता येतील या संदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले की निर्बंध शिथिल केले जातील  पण लॉकडाऊन सरसकट उठविला जाणार नाही.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकमतला सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असलेले जिल्हे आणि प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध वेगवेगळे असतील. एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये निर्बंध कमीअधिक ठेवता येतील का? याचीही चाचपणी केली जात आहे. 

सकाळी ७ ते दुपारी १
n सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७  ते दुपारी १ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली जाईल. सुरुवातीला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर असलेली बंदी कायम राहील. 
n रेस्टॉरन्ट बंद राहतील. पण पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरी सुरू असेल. सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद असतील. 
n मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची अनुमती नसेल. पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे बाजारपेठा खुल्या करण्याबाबतची भूमिका घेतली जाईल. 

१२ जिल्ह्यांमध्ये मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक
प्रमुख शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी १२ जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. 
यात सिंधुदुर्ग, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. 

 १५ जिल्हे रेड झोनमध्ये
बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद हे १५ जिल्हे कोरोनाच्या दृष्टीने रेडझोनमध्ये आहेत. त्यांच्याबाबत निर्बंधांचे स्वरुप वेगळे राहील, 
असे सूत्रांनी सांगितले.

लॉकडाऊन, निर्बंध ३० जूनपर्यंत वाढवा 
देशात सध्या कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांतील लॉकडाऊनची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी विविध राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा फैलाव कमी होण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे राज्यांनी यापुढेही कडक पालन सुरू ठेवलेच पाहिजे. या निर्बंधात शिथीलता आणण्याबाबत स्थिती पाहून निर्णय घेता येतील.  

Web Title: Coronavirus: Restrictions in the state will be relaxed! The lockdown will continue; New regulations soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.