coronavirus: बाधित क्षेत्रांची होणार पुनर्रचना : महापालिकेचा निर्णय; मुंबईकरांची भीती कमी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:34+5:302020-05-15T05:01:06+5:30
मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आलेली २३१ क्षेत्र वगळण्यात आली.
मुंबई : कोरोनाबाधित एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण परिसराला बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. परिणामी, मुंबईतील बाधित क्षेत्रांची संख्या दोन हजार ८००वर पोहोचली आहे. प्रत्यक्षात यापैकी एक हजार १५३ बाधित क्षेत्रांमध्ये केवळ एक रुग्ण आढळून आला आहे. बाधित क्षेत्राच्या मोठ्या आकड्यामुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरत असल्याने सर्व बाधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आलेली २३१ क्षेत्र वगळण्यात आली. परिणामी, २७ एप्रिलपर्यंत मुंबईमधील बाधित क्षेत्रांची संख्या ८०५वर आली होती. मात्र आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ हजारांपर्यंत पोहोचला आहे. या काळात बाधित क्षेत्रांचा आकडादेखील दोन हजार ८००वर पोहोचला आहे. या बाधित क्षेत्रांचा आढावा नवनियुक्त आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी घेतला आहे.
पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ते बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. परंतु, मुंबईत एक रुग्ण सापडलेल्या इमारतीचाही बाधित क्षेत्रात समावेश करण्यात येतो. यामुळेच मुंबईतील बाधित क्षेत्राचा आकडा २८००वर पोहोचला आहे.
त्यामुळे सर्व प्रतिबंधित क्षेत्रांची प्रभावी पुनर्रचना करून संख्या कमी करण्यात येणार आहे. यामध्ये कंटेनमेंट झोनचे क्षेत्र वाढवून कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दैनंदिन गरजा सशुल्क भागवल्या जातात
1कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण सापडताच सदर व्यक्ती राहत असलेली इमारत, चाळ परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. या ठिकाणी आतल्या रहिवाशांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आणि बाहेरच्या लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा सशुल्क पद्धतीने भागविण्यात येत आहेत.
2एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. अशा तब्बल ११५३ इमारती बाधित क्षेत्राच्या यादीत आहेत. मात्र यामुळे अशा इमारतींबाहेर पहारा देणाºया पोलीस दलाचे मनुष्यबळ वाया जात आहे.
3बाधित क्षेत्र जाहीर करण्याच्या नवीन धोरणानुसार एक रुग्ण सापडलेल्या इमारतीमध्ये पालिका कर्मचारी निर्जंतुकीकरण करतील. त्यानंतर सदर इमारतीमध्ये बाहेरून कोणी येणार नाही आणि रहिवासी कुठे बाहेर जाणार नाहीत, याची जबाबदारी इमारतीच्या कार्यकारिणी समितीच्या पदाधिकाऱ्यांची असणार आहे.
4तर बाधित क्षेत्रातील रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका आणि पोलीस यांच्या समन्वयाने अत्यावश्यक आणि दैनंदिन गरजांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.